कळस/बाभुळगाव : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने पुणे-सोलापूर-नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण १०३ टक्के भरले असून, सोमवारी सार्यकाळी उजनी धरणात दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग दोन लाख पाच हजार क्यूसेकपर्यंत वाढला आहे.
त्यामुळे संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सायंकाळी ५ वाजता तब्बल १ लाख २५ हजार क्यूसेक पाणी प्रवाह वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे नीरा नदीतूनही मोठ्या प्रमाणात सोडलेले पाणी भीमा नदीत नृसिंहपूरजवळ येत आहे त्यामुळे भीमा नदीला पूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. धरणात एकूण पाणीसाठा ११९ टीएमसी असून, उपयुक्त पाणीसाठा ५५ टीएमसी म्हणजे टक्केवारी १०३ टक्के एवढी झाली आहे.
पुण्यातील खडकवासला, बंडगार्डनमार्गे दौडमार्गे पाण्याचा विसर्ग दीड लाख क्यूसेकच्या पुढे सरकल्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यावर नियंत्रण करण्याचा भाग म्हणून धरणातून भीमेच्या पात्रासह धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यात तसेच भीमा सीना ओडकालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे.
धरणातील पाणीपातळी ३३२०.०३ दशलक्ष घनमीटर आहे, तर उपयुक्त पाणीपातळी १५१७.२२ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. धरणात एकूण पाणीसाठा १११७.२३ टीएमसी आहे, तर उपयुक्त पाणीसाठा ५३.५७ टीएमसी इतका आहे.
नदी पात्रात १ लाख २५ हजार क्युसेक व धरणावरील जलविद्युत निर्मितीसाठी १ हजार ६०० क्यूसेक असे मिळून १ लाख २६ हजार ६०० क्यूसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत, तर दुसरीकडे नीरा नदीतूनही मोठ्या प्रमाणात सोडलेले पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे.
त्यामुळे भीमेला पूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भीमा व नीरा नदीचे पाणी नृसिंहपूरजवळ भीमा-नीरा नदीच्या संगमात मिसळते. नंतर हे पाणी भीमा नदीवाटे पंढरपूरच्या दिशेने येत आहे. त्यामुळे पंढरपुरात नदीला पूर येण्याची शक्यता असते.
उजनी धरण पाणीपातळी स्थिती (सायंकाळी ५ ऑगस्ट २०२४ रोजी)३३२०.०३ पाणीपातळी एकूण१५१७.२२ उपयुक्त पाणीपातळी (दशलक्ष घनमीटर)१०२.८९ टीएमसी एकूण पाणीसाठा५५.१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठाएकूण टक्केवारी - ११८.७८ टक्के२ लाख ५ हजार ५०१ क्युसेक्स दौंडमधून आवक
सावधानतेचा इशारा...■ उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे उजनी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे साठा झपाट्याने वाढत आहे.■ उजनी धरणाच्या सोळा दरवाजांतून भीमा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे.■ त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील शेती पंप, नदीकाठची शेती, अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, अशी सूचना उजनी धरण पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.