टेंभुर्णी : उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड येथील विसर्गात पुन्हा वाढ झाली असून ४२ हजार ६३७ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. सध्या उजनी धरणाचीपाणीपातळी सायंकाळी सहा वाजता ६२ टक्के झाली असून पुढील दोन दिवसांत उजनी ७५ टक्क्यांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.
भीमा खोऱ्यातील पाऊस असाच सुरू राहिल्यास यावर्षी उजनी १५ ऑगस्टपर्यंत शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. सध्या उजनी धरणात ९६.७६ टीएमसी पाणीसाठा झाला असून ३३.१० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
बंडगार्डन येथून सायंकाळी पाच वाजता २२ हजार ८३४ क्युसेक विसर्ग दौंड येथील विसर्गात मिसळत आहे. यामुळे पुढील दोन दिवस दौंड येथील विसर्ग २० ते २५ हजार क्युसेकदरम्यान कायम राहणार आहे.
भीमा खोऱ्यातील १९ धरणांपैकी १६ धरणे ओव्हरफ्लो होत आली आहेत. यामुळे इथून पुढे भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्यास उजनी धरणाकडे मोठ्या प्रमाणात विसर्ग येण्याची शक्यता आहे.
सध्या खडकवासला धरणातून ११ हजार ४०७, पानशेत ४ हजार ५७८, मुळशी ६ हजार ३६३, कासारसाई ८१४, पवना १ हजार ८००, आंध्रा २११, चासकमान ६ हजार ८४०, कळमोडी ६७४, चिलईवाडी १ हजार ३८८ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.
भीमा खोऱ्यातील १९ पैकी येडगाव - ७४.१३ टक्के, डिंभे ७८.८९, चिलईवाडी - ७८.७९, कळमोडी - १००, चासकमान ९४.०१, भामा असखेड - ७८.९०, वडीवळे - ९०.१९, आंध्रा- १००, पवना - ९१.४७, कासारसाई - ८६.४७, मुळशी - ९३.३१, टेमघर - ९३.७२, वरसगाव ९१.०३, पानशेत - ९०.१३, खडकवासला - ७२.१३ टक्के पाणीपातळी झाली आहे. तर घोड धरणात ६१ टक्के पाणीपातळी झाली आहे.