Join us

Ujani Dam Water Level: उजनी धरणाची मोठी खबर धरण आलं प्लसमध्ये किती झाला पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 8:54 AM

पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरणात येणारा पाण्याचा प्रवाह वाढला आहे. मागील ३६ तासांत तब्बल २५ टक्के पाणी उजनीत आल्याने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता माइनसमधील हे धरण प्लसमध्ये आले आहे.

गणेश पोळटेंभुर्णी : पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरणात येणारा पाण्याचा प्रवाह वाढला आहे. मागील ३६ तासांत तब्बल २५ टक्के पाणी उजनीत आल्याने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता माइनसमधील हे धरण प्लसमध्ये आले आहे.

तब्बल १२३ टीएमसी क्षमता असलेल्या उजनीने आता ७१ टीएमसीपर्यंत पाणीपातळी गाठली आहे. धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी आणखी ५२ टीएमसी पाण्याची गरज आहे. विशेष बाब म्हणून पाच वर्षांनंतर प्रथमच दौंडमधून १ लाख ८८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यात रात्री घट झाली असून नऊ वाजता १ लाख ४३ हजारांचा विसर्ग होता.

भीमा खोऱ्यातील पावसाने चार दिवसांनंतर शुक्रवारी दिवसभर विश्रांती घेतल्याने बंडगार्डनसह दौंड विसर्गात घट होत चालली आहे. भीमा खोऱ्यात चार दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाची पाणी पातळी गेल्या ३६ तासांत २६ टक्क्यांनी वाढली आहे; तर १४ टीएमसी पाणीसाठा उजनीत जमा झाला आहे.

दौंड येथील विसर्गात घट होत असली तरी उजनी पाणीपातळी पुढील दोन दिवसांत २५ टक्क्यांपेक्षा जास्त होणार आहे. सध्या बंडगार्डन येथून सायंकाळी ६ वाजता २९ हजार २८४ क्युसेक विसर्ग चालू होता. दौंड येथून १ लाख ६५ हजार ३७८ क्युसेक विसर्ग सुरू होता.

या हंगामातील सर्वाधिक दुपारी १ वाजता १ लाख ८८ हजार क्युसेकपर्यंत दौंड विसर्ग पोहोचला होता. दुपारी एकनंतर दौंड येथील विसर्गात घट होत गेली. उजनीत गुरुवारी सकाळी वजा १४ टक्के साठा होता.

शक्रवारी सायंकाळी ६ वाजता १०.६७ टक्के पाणीपातळी झाली होती. या पावसामुळे उजनी धरणात १४ टीएमसीने गेल्या ३६ तासांत वाढ झाली आहे. सध्या उजनी धरणात ५.७२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला असून एकूण ७१.३५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

खडकवासलामधून विसर्ग बंदभीमा खोऱ्यातील पावसाने शुक्रवारी विश्रांती घेतल्याने खडकवासला धरणातून सोडण्यात येत असलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे; तर मुळशी येथून ५ हजार ३००, वडीवळे २ हजार १७२, कळमोडी १ हजार ३४, चिलईवाडी १ हजार ६९८, वडजमधून २ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.

वडज, चिलईवाडीतून विसर्गवडज व चिलईवाडी धरणांतून विसर्ग सोडण्यात येत असला तरी घोड धरण पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय हे पाणी उजनी धरणात मिसळत नाही. त्यामुळे आता उजनीत येणाऱ्या विसर्गात घट होणार आहे. पुढील काही दिवसांत आणखी मोठा पाऊस झाल्यास उजनी धरणास मदत होणार आहे.

टॅग्स :उजनी धरणपाणीदौंडपुणेपाऊससोलापूरखडकवासला