टेंभुर्णी : पुणे जिल्ह्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड येथून उजनी धरणात मिसळणाऱ्या विसर्गात घट झाली आहे. दौंड येथून १२ हजार ७९७ क्युसेक विसर्ग सुरू आहे तर उजनी धरणाचीपाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदीपात्रात १० हजार क्युसेक विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे.
वीज निर्मिती १ हजार ६०० क्युसेक, मुख्य कालवा २ हजार क्युसेक, भीमा सिना जोड कालवा ९०० क्युसेक सिना माढा उपसा सिंचन योजना २१० क्युसेक तर दहिगाव १०० क्युसेक असा एकूण १३ हजार ८१० क्युसेक विसर्ग उजनीतून शेतीसाठी सोडण्यात येत आहे.
११० टक्क्यांपर्यंत पोहोचलेली पाणी पातळी १०५.१४ टक्केपर्यंत ठेवली आहे. भीमा खोऱ्यातील जवळपास सर्वच धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यास दौंड येथील विसर्गात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन उजनी धरण व्यवस्थापनाकडून पुढील पूरस्थिती टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.
यामुळे सध्या जेवढा दौंड येथून विसर्ग येत आहे, तेवढा उजनीतून सोडण्यात येत आहे. सध्या धरणात १२० टीएमसी पाणीसाठा झाला असून, ५६.३५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.