टेंभुर्णी : भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दौंड विसर्गात मोठी वाढ झाली असून, दौंड येथून ५८ हजार ५८५ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत असल्याने उजनीतून शनिवारी सायंकाळपासून ६० हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत वाढवण्यात आला आहे.
तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये रात्री ८.४५ वाजता ७१ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला. पाऊस वाढल्याने उजनी धरणाचीपाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदीत ३० हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येत होता.
त्यात रात्री वाढ करण्यात आली होती. रविवारी सायंकाळी ६ वाजता उजनी धरणाचीपाणी पातळी १०२.४५ टक्केवरती स्थिर ठेवण्यात आली आहे. तर, ५४.८८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या उजनी धरणात एकूण ११८.५४ टिएमसी पाणीसाठा आहे.
गेल्या तीन महिन्यांत उजनी धरणात १२७ टीएमसी पाणी दौंड येथून उजनी धरणात आले आहे. तर उजनीतून भीमा नदीत ३८ टीएमसी पाणी सोडून देण्यात आले आहे. दि.९ जून पासून उजनी धरणाची पाणीपातळी वाढण्यास सुरुवात झाली होती. दौंड येथून सुरू असलेले विसर्ग गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू आहे.
सध्या दौंड येथून ६ हजार ३७४ क्युसेक आवक होत आहे. यात रविवारपासून आणखी वाढ करण्यात आली आहे. उजनी धरण परिसरात एकूण ३७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उजनीतून सोडलेल्या पाण्यासाठी भीमा नदीला पूर देण्याची शक्यता आहे.
वीरमधून विसर्गात सातत्याने वाढ- वीर धरण १०० टक्के भरलेले असून पाणीपातळीमध्ये काही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नीरा देवघर धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. तसेच भाटघर धरण, नीरा देवधर व गुंजवणी धरणातून सांडव्यावरून तसेच विद्युत गृहाद्वारे विसर्गात वाढ झाली आहे.- त्यानुसार रविवारी सायंकाळी ७ वाजता नीरा नदीमध्ये वीर धरणाच्या नीरा डाव्या कालव्यात ३५० क्युसेक विसर्ग, नीरा उजव्या कालव्यात १००० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वीर धरणाच्या सांडव्याद्वारे रात्री ८.४५ वाजता ६१९२३ क्युसेकवरून ६९९९९ क्युसेक म्हणजे नीरा नदीमध्ये एकूण ७१३४९ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.