टेंभुर्णी : भीमा खोऱ्यासह पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. बंडगार्डन येथील विसर्गात वाढ झाली आहे तर वडीवळे धरणातून ३ हजार १०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. सध्या दौंड येथील विसर्ग स्थिर असून सायंकाळी सहा वाजता ८ हजार ६५ क्युसेक सुरू होता तर उजनीची वजा २१.५४ टक्के पाणी पातळी झाली आहे.
पावसाचा जोर आणखी वाढल्यास येत्या काही दिवसांमध्ये उजनी प्लस होण्याची आशा आहे. भीमा खोऱ्यातील कळमोडी १०० टक्के, वडीवळे ९० टक्के, खडकवासला ७८ टक्के भरले आहेत.
पानशेत ६०, कासारसाई ५५, चिलईवाडी ५५ टक्के भरले आहे तर टेमघर धरण परिसरात ५० मिमी. वडीवळे ४०, वरसगांव ३६ व पानशेत धरण क्षेत्रात ३४ मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.
दौंड येथील विसर्ग कायम असला तरी बंडगार्डन विसर्गात वाढ झाली आहे. बंडगार्डन येथून ७ हजार ८२१ क्युसेक विसर्ग सुरू आहे. दिवसभर पुणे शहरात पावसाची रिपरीप सुरू होती. भीमा खोऱ्यातील खेड, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर परिससरात संततधार पाऊस सुरू आहे.
पुढील दोन दिवसात उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. खडकवासला, पानशेत व पुणे शहरात दुपारपासून पावसाची संततधार सुरू असल्याने बंडगार्डन विसर्गात देखील वाढ होणार आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा ८ टक्के पाणीसाठा अधिक
- मागील वर्षी १ ऑगस्टला धरण मायनसमधून वडीवळे धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग थेट इंद्रायणी नदीद्वारे दौंड येथील विसर्गात मिसळणार आहे.
- कळमोडी धरणाचा स्वयंचलित दरवाजातून धरणातून १ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.
- सध्या उजनी धरणाची पाणी पातळी वजा २१.५४ टक्के झाली असून गतवर्षी २२ जुलैला वजा २८.७८ टक्के होती.
- गतवर्षीचा तुलनेत यंदा ८ टक्के पाणी पातळी जास्त आहे.
मागील वर्षी १ ऑगस्टला धरण मायनसमधून बाहेर
गतवर्षी २२ जुलैला दौंड येथून २२ हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. त्यामुळे उजनी धरण १ ऑगस्टला मायनसमधून बाहेर आले होते. गतवर्षी ४८.२४ टीएमसी पाणीसाठा होता. सध्या ५२.१२ टीएमसी असून गतवर्षी पेक्षा चार टीएमसी पाणीसाठा धरणात जास्त झाला आहे.