टेंभुर्णी: दौंड येथून उजनी धरणात मिसळणारा विसर्ग २६ हजार ८७८ क्युसेकने सुरू असून, उजनी धरणाने मंगळवारी मध्यरात्री पन्नास टक्के होऊन शंभरीकडे वाटचाल केली आहे. सध्या उजनी धरणाचीपाणी पातळी ५४.०३ टक्के झाली आहे. एकूण ९२.६० टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
भीमा खोऱ्यातील धरण परिसरात सातत्याने कमी-अधिक प्रमाणात पाऊस चालू असल्याने उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड येथील विसर्गात कमी-जास्त प्रमाणात पाणी येत आहे. मागील आठवड्यापेक्षा गेल्या २२ जुलैपासून दौंड येथील वाढता प्रवाह आहे.
दर तीन तासाला १ टक्के याप्रमाणे सध्या उजनीची पाणीपातळी वाढत आहे. खडकवासला धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी खडकवासला येथून कमी-जास्त पावसाचा अंदाज घेऊन पाणी सोडण्यात येत आहे.
सध्या उजनी धरणात २९ टीएमसी उपयुक्त पाणीपातळी झाली असून, उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी २४ टीएमसी पाण्याची गरज आहे. पावसाळ्याचे आणखी दोन महिने शिल्लक आहेत.
सध्या भीमा खोऱ्यातील धरणे बऱ्यापैकी भरत आली असून, यावर्षी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची स्थिती निर्माण होणार आहे. गतवर्षी उजनी याच दिवशी १ ऑगस्ट रोजी मृत साठ्यातून बाहेर निघाले होते. गतवर्षीपेक्षा यावर्षी उजनी धरणाची स्थिती उत्तम असून, यामुळे ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांची धावपळ दिसून येत आहे.