सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा रविवार, दि. २१ रोजी सायंकाळी सहा वाजता संपला आहे. धरण शून्य टक्के मृतसाठ्यात जाण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी उजनी धरण १२ ऑक्टोबर रोजी ६०.६६ टक्के भरलेले होते. अपुऱ्या पावसामुळे हे धरण शंभर टक्के भरू शकले नाही. ६ मे २०२३ रोजी ते मृत साठ्यात गेले होते; तर ९ जुलै रोजी वजा ३६.१४ टक्क्यांपर्यंत खाली गेले होते.
उजनी पाणलोट क्षेत्रात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याने १० जुलैपासून उजनी धरणाचीपाणीपातळीत हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली होती. १ ऑगस्ट २०२३ रोजी वजा पातळीतून उजनी बाहेर आले होते. माइनसचा विळखा तोडायला तीन महिन्यांचा कालावधी लागला होता. त्यानंतर पडलेल्या पावसाने उजनीची पाणीपातळी १२ ऑक्टोबरपर्यंत ६०.६६ टक्के झाली होती. ९६.१५ टीएमसीपैकी ३२.५० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला होता. जिल्ह्यात रब्बी पिके व ऊसहंगाम सुरू असल्याने पिके वाचवण्यासाठी उजनीचे पाणी सोडण्यात येत होते.
अधिक वाचा: उन्हाळी हंगामात सूर्यफुल लागवड करून खाद्यतेलाचा खर्च वाचवा
सोमवारपासून उजनी धरण मृतसाठ्यात जाण्यास सुरुवात होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उजनी चार महिने अगोदरच धरण माइनसमध्ये जात आहे. पुढील काही महिन्यांत बॅकवॉटर शेतीसह सोलापूर महानगरपालिकेला दुबार पंपिंगचा सामना करावा लागणार आहे. गेल्या चार महिन्यांत उजनी धरणातील उपयुक्त ३२.५० टीएमसी पाणीसाठा संपला आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता तो शून्य टक्के झाला होता.
सध्या ६३.६६ टीएमसी पाणीसाठा शिल्लकसध्या उजनी धरणात ६३.६६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. उजनी मुख्य कालव्यातून २ हजार ४०० क्युसेक, भीमा-सीना जोडकालव्यातून २९० क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून २९७, तर दहिगाव योजनेतून ८० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. सीना-माढा व दहीगाव योजना सोमवारी बंद होणार आहे. भीमा-सीना जोडकालव्यातून १०० क्युसेकपर्यंत विसर्ग चालू राहणार आहे; तर उजनी मुख्य कालवा साधारण १३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.