गणेश पोळ
टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचीपाणीपातळी गेले तीन दिवसांपासून संथगतीने वाढत असून, दररोज एक टक्क्याप्रमाणे वाढ होत आहे. उजनी व भीमा खोऱ्यातीत पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड येथील विसर्ग ३ हजार २४८ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा उजनी धरणात लवकर पावसाला सुरुवात झाली असली तरी गतवर्षी १७ जून रोजी वजा २८.६८ टक्के पाणीपातळी होती. सध्या सायंकाळी ६ वाजता वजा ४८.६५ टक्के झाला होता.
गतवर्षी वजा ३६.९९ टक्के इतका पाणीसाठा खलावला होता. यावर्षी ५९.९९ टक्क्यांपर्यंत खाली गेला होता. गतवर्षी उजनी केवळ ६०.६६ टक्के भरल्याने उजनी पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खलावली होती.
गेल्या दहा दिवसांत उजनी धरणाची पाणीपातळी १२ टक्क्यांनी वाढली आहे, तर ६.८ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. सध्या धरणात ३७.६० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. उजनी धरणाची पाणीपातळी वाढत असल्याने उजनी बॅकवॉटर शेतकऱ्यांची धावपळ कमी होताना दिसत आहे.
पाणीपातळी जशी खाली जात गेली, तसे केबल व पाइप वाढवण्याची धावपळ शेतकऱ्यांना करावी लागत होती. यावर्षी ६ जून रोजी ५९.९९ टक्क्यांपर्यंत पाणीपातळी खाली गेली होती.
शेतकऱ्यांना आशा धरण प्लसमध्ये येण्याची
उजनी पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसाने पाणीपातळी ७ जूनला स्थिर राहिली होती. ८ जूनपासून उजनी धरणाची पाणीपातळी वाढण्यास सुरुवात झाली होती. भीमा खोऱ्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे ९ जूनपासून दौंड विसर्गास सुरुवात झाली होती. कमी-अधिक प्रमाणात दौंड विसर्ग सुरू असून, संथगतीने का होईना उजनी पाणीपातळी हळूहळू वाढत आहे. उजनी लाभ क्षेत्रात खरीप पेरणीयोग्य पाऊस झाला असला तरी ऊस लागवडीसाठी उजनी धरण मायनसमधून कधी बाहेर येते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
अधिक वाचा: Koyna Dam कोयनेला ३१ मिलिमीटर पाऊस; धरणात आता किती टीएमसी पाणीसाठा