टेंभुर्णी : उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने उजनीतून भीमा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग एक महिन्यानंतर बंद करण्यात आला आहे. एका महिन्यात उजनीतून भीमा नदीत एकूण ९३ टीएमसी अतिरिक्त पाणी सोडून देण्यात आले असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापक अभियंता प्रशांत माने यांनी दिली.
गेल्या महिन्यात ४ ऑगस्ट रोजी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरत आल्याने उजनी धरणाचीपाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदीत २० हजार क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता.
महिनाभरापासून उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येत असलेला विसर्ग दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता बंद करण्यात आला. उजनी धरणाच्या ४२ पैकी १६ दरवाजांतून हा विसर्ग सोडण्यात येत होता. तर दौंड येथून गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने कमी-जास्त प्रमाणात उजनी धरणात पाणी येत आहे.
यामुळे यावर्षी उजनी धरण दोन महिन्यांत पूर्ण क्षमतेने भरले. उजनी धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के भरले असल्याने उजनीतून भीमा नदीत ९३ टीएमसी अतिरिक्त पाणी सोडून द्यावे लागले.
सध्या दौंड येथून ४ हजार २६६ क्यूसेक विसर्ग उजनीत मिसळत असून, उजनीतून वीजनिर्मिती १ हजार ६०० क्यूसेक विसर्ग उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येत आहे.
उजनी मुख्य कालवा १ हजार ६०० क्यूसेक, सीना-माढा उपसा सिंचन १७५ क्यूसेक, भीमा-सीना जोड कालवा २०० क्यूसेक, दहिगाव उपासा सिंचन यासाठी ८० क्यूसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.
उजनी धरणाची पाणी पातळी १०३.७९ टक्के असून, ११९.२६ टीएमसी पाणीसाठा असून, ५५.६० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. गेले एक महिना ४ ऑगस्टपासून गेल्या ३८ दिवसांपासून उजनी धरणावर दररोज २४ तासात २ लाख ८८ हजार युनिट वीजनिर्मिती होत आहे.
गतवर्षी केवळ २२% पाणी पातळीगतवर्षी उजनी ६०.६६ टक्के भरले होते, तर यावर्षी उजनी ५ ऑगस्ट रोजी शंभर टक्के भरले. गतवर्षी ११ सप्टेंबर २३ रोजी उजनी धरणाची पाणी पातळी केवळ २२.१४ टक्के होती. यावर्षी दौंड येथून सर्वाधिक २ लाख ५ हजार ५०१ क्यूसेक इतक्या मोठ्या प्रमाणात उजनीत आवक झाली होती. तर १ लाख २६ हजार ६०० क्यूसेक विसर्ग उजनीतून भीमा नदीत सोडण्यात आला होता.