टेंभुर्णी: भीमा खोऱ्यातील पाऊस थांबल्याने दौंड विसर्गात मोठी घट झाली असून, दौंड दि.१६ रोजी सायंकाळी ६ वाजता ११ हजार ८५१ क्युसेक विसर्ग सुरू आहे. सोमवारी दौंड विसर्गात मोठी वाढ झाली होती. दौंड येथील गेल्या २४ तासांत वाढलेल्या विसर्गाने उजनी धरणाचीपाणी पातळी ४ टक्क्यांनी वाढली आहे.
सोमवारी सायंकाळी वजा ३३.१७ टक्के होती. सध्या वजा २९.३० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर उजनी पाणी साठ्यात ३ टिएमसीने वाढ झाली आहे. सध्या एकूण ४८ टिएमसी पाणीसाठा झाला आहे. उजनी मृत साठ्यातून बाहेर येण्यासाठी आणखी १५ टिएमसी पाण्याची गरज आहे.
रविवारपासून भीमा खोऱ्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. यामुळे रविवारी सायंकाळी दौंड येथील विसर्गातदेखील वाढ झाली होती. सोमवारी सायंकाळी २२ हजार क्युसेकपर्यंत दौंड विसर्ग गेला होता.
मात्र भीमा खोऱ्यातील उजनी पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने मंगळवार सकाळपासून दौंड विसर्गात घट होत गेली. मंगळवार सकाळी १८ हजार २१ क्युसेक विसर्ग सुरू होता.
सायंकाळी सहा हजार क्युसेकने घट झाली. घट झाली असली तरी आणखी काही दिवस दौंड विसर्ग सुरू राहणार असल्याने उजनी पाणी पातळी हळूहळू वाढ होण्यास मदत होणार आहे.