Join us

या प्रकल्पातील पाणीपातळी जोत्याखाली, उन्हाच्या तीव्रतेने बाष्पीभवन वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 9:18 AM

उन्हाळ्याचे आणखी काही दिवस शिल्लक असल्याने प्रकल्पातील पाणीसाठा कमी होणार याबाबत शंका नाही. त्यामुळे पाणीसाठा जपून वापरावा लागणार आहे.

हाळी गावापासून जवळ असलेल्या तिरू मध्यम प्रकल्पात सध्या एकूण पाणीसाठा ३.४७ दलघमी इतका आहे. तर जिवंत पाणीसाठा शून्य टक्के उरला आहे. उन्हाच्या तीव्रतेने बाष्पीभवन वाढत चालल्याने पाणीसाठ्यात घट होत चालली आहे. उन्हाळ्याचे आणखी काही दिवस शिल्लक असल्याने प्रकल्पातील पाणीसाठा कमी होणार याबाबत शंका नाही. त्यामुळे पाणीसाठा जपून वापरावा लागणार आहे.

उदगीर, जळकोट व चाकूर तालुक्यातील काही गावातून तिरू नदीचे पात्र विस्तारले आहे. या नदीवर हाळी गावाजवळ असलेल्या चिमाचीवाडी येथे तिरू मध्यम प्रकल्प अस्तित्वात आला. या प्रकल्पाचे काम १९७६ साली पूर्ण झाले. या प्रकल्पाची साठवण क्षमता २३.३२ दलघमी असून पाणलोट क्षेत्र २६९.६७ चौ. किमी. इतके आहे. त्यामुळे २६५४.६० हेक्टर जमिनीला याचा लाभ होतो. अशातच दहा वर्षापूर्वी प्रकल्पाची उंची एक मीटरने वाढवल्याने पाणीसाठ्यात आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे याचा फायदा हाळी मोरतळवाडी, आडोळवाडी, वाढवणा बु., वाढवणा खु., लाळी, कुमठा, शिवणखेड, सुकणी आदी गावातील शिवारांना होतो. त्यामुळे हा प्रकल्प परिसरासाठी वरदान मानला जातो. शेतीला होणारा पाणीसाठा ३.४७ दलघमी इतका आहे. उष्णतेने बाष्पीभवन होऊन साठ्यात घट होत चालली असून सध्या प्रकल्पात शून्य टक्के जिवंत जलसाठा आहे. शेतीसाठी होणार पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. जर कोणी अवैधपणे पाणी उपसा करत असल्याचे निदर्शनास आल्यास योग्य कारवाई केली जाईल असे तिरु मध्यम प्रकल्पाचे अभियंता अरुण त्रिपाठी यांनी सांगितले.

प्रकल्पावरुन ५२ खेडी पाणीपुरवठा योजना...

तसेच प्रकल्पावरून ५२ खेडी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. याशिवाय हंडरगुळी, वाढवणा बु., शिरूर ताजबंद या मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावांसाठी पाणी योजना सुरू आहे. आता हाळी गावासाठीच्या योजनेचे काम सुरू आहे. त्यामुळे हा प्रकल्प दहा लाख नागरिकांची तहान भागवणारा आहे.

गतवर्षीच्या पावसाने प्रकल्पातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली होती. मात्र यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने प्रकल्प शंभर टक्के भरू शकला नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणीसाठ्यात घट होत आहे. आगामी काळात प्रकल्पातील जलसाठा संपल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शेतीसाठी होणारा पाणीपुरवठा बंद केल्याचे सांगितले जात असले तरी प्रकल्पातून चोरून पाणी उपसा होत आहे.

टॅग्स :धरणपाणीपाणी टंचाईलातूर