राज्यात अवकाळी पावसाने हैदोस घातला असून मध्य महाराष्ट,मराठवाडा कोकणात पावसाने मोठे नुकसान झाले. दरम्यान धरणसाठ्यात जलसाठा कसा आहे? जाणून घ्या..
मराठवाड्यातील धरणांमध्ये एवढा जलसाठा
राज्यात मराठवाड्यातील धरणांमध्ये इतर विभागांच्या तुलनेत सर्वात कमी पाणीसाठा राहिला आहे. १५.३६ टक्के उपयुक्त जलसाठा मराठवाडा विभागात राहिला आहे. मागील वर्षी हा पाणीसाठा ४२.४६ टक्के होता.
जायकवाडी धरणात आता केवळ १२.९४ टक्के पाणी उरले असून मागील वर्षी हा पाणीसाठा ५२.३६ टक्के होता. दरम्यान आज दि २१ एप्रिल रोजी धरणात २८० दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक राहिला आहे.
राज्यात सर्व धरणांमध्ये सरासरी ३१.७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, मराठवाड्यासह पुणे, नाशिक विभागाचा पाणीसाठा वेगाने कमी होत असल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून समोर येते.
बीडमधील मांजरा धरणात आता ४.९७ टक्के पाणी उरले आहे. हिंगोलीतील सिद्धेश्वर व येलदरी ४०.६९ टक्के, ३०.१५ टक्क्यांनी भरले आहे. नांदेड जिल्ह्यातील निम्न मनार २९.२१ टक्क्यांवर गेले आहे. तर विष्णुपुरी धरणात ३६.५१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
धाराशिवमधील बहुतांश धरणातील पाणी घटत असून जलसाठा शुन्यावर गेला आहे. सिना कोळेगाव, निम्न तेरणा शुन्यावर गेले आहे. लातूर मधील लघू, मध्यम मोठे जलाशय आटले असून धरणसाठे जोत्याखाली गेले आहेत. परभणीमध्ये निम्न दुधना धरणात ४.९१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.