Join us

अवकाळी पाऊस ओसरण्याची शक्यता, शेतकऱ्यांना काढणीसाठी तज्ञांनी काय सांगितलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 4:52 PM

अवकाळीचे वातावरण निवळण्याची शक्यता असुन सध्या चालु असलेले पीक काढणीचे कामे बिनधास्तपणे उरकण्यास वातावरणीय हरकत नसावी

कमी दाबाची रेषा उत्तर तमिळनाडू ते कर्नाटक, मराठवाड्यावरून जात आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे. जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज दिला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात उद्या सोमवार दि.१ एप्रिलपासुन पुढील पाच दिवस म्हणजे शुक्रवार दि.५ एप्रिलपर्यन्त महाराष्ट्रात अवकाळीचे वातावरण निवळण्याची शक्यता असुन सध्या चालु असलेले पीक काढणीचे कामे बिनधास्तपणे उरकण्यास वातावरणीय हरकत नसावी . त्यानंतर म्हणजे शनिवार व रविवारी दि.७ व ८ एप्रिलला दोन दिवस महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता असली तरी त्या अगोदर दोन दिवस पावसासंबंधी खुलासा केला जाईल.  आजच त्यासंबंधी धास्ती बाळगू नये, असे वाटते. 

दिवसाच्या उष्णतेची काहिली 

आजपासुन गुरुवार दि.४ एप्रिल पर्यन्त संपूर्ण मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात  व त्यानंतर म्हणजे गुरुवार दि.४ एप्रिल नंतर विदर्भातील ११ जिल्ह्यात दुपारच्या कमाल तापमानाच्या ९५ व्या टक्केवारीत  स्पष्ट करतांना म्हणता येईल कि कमाल तापमान नोंदणाऱ्या एकूण सर्व केंद्रापैकी ९५% केंद्रावर दुपारचे निम्न पातळीतील कमाल तापमान ४० डिग्री से. ग्रेड जाणवेल तर केवळ उर्वरित ५% केंद्रावर मात्र भाग बदलत निम्न पातळीतील ४० डिग्री से. ग्रेड कमाल तापमानपेक्षा अधिक दुपारचे कमाल तापमान(म्हणजे ४१, ४२ डिग्री से. ग्रेड) जाणवेल. 

 रात्रीचा उकाडा 

दरम्यानच्या काळात पहाटेचे किमान तापमान हे सुद्धा सरासरी किमान तापमानापेक्षा ३ ते ५ डिग्री से.ग्रेड ने अधिक जाणवणार असुन, मध्यमहाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ८ अश्या एकूण १८ जिल्ह्यात दिवसाच्या उष्णतेच्या काहिलीबरोबर दि. ४ एप्रिलपर्यन्त रात्रीचा उकाडही चांगलाच जाणवू शकतो, असे वाटते. 

उष्णतेची लाट - विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र भाग बदलत काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी अवस्था जाणवेल. 

माणिकराव खुळे Meteorologist (Retd)IMD Pune.             

टॅग्स :पाऊसशेतीपीकतापमान