Join us

अवकाळीने उडाली दाणादाण; मराठवाड्याच्या विविध भागांत गारपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 09:15 IST

हळद, केळी, आंब्यासह बाजारी ज्वारी पिकांचे नुकसान.

मराठवाड्यात अनेक ठिकाणी बुधवारी (दि.१०) रात्री आणि गुरुवारी गारपीट झाली. वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. तर विविध ठिकाणी वीज पडून सहा जनावरांचा मृत्यू झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड, सोयगाव भागात गारांचा खच बघायला मिळाला. ज्यात मका, बाजरी, मिरचीसह शेडनेटमधील पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर काही ठिकाणी विद्युत  खांब कोसळ्याने अनेक भागात रात्रभर अंधार होता.

जालना जिल्ह्यात देखील गुरुवारी (दि.११) सायंकाळी भोकरदन, जालना, अंबड भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. ज्यात आंबा सह इतर फळपिकांचे नुकसान झाले. तसेच अनेक भागात झाडे उन्मळून पडल्याने घरांसह शेतीपिकाचेही नुकसान झाले. दानापुर, आव्हाना, पेरजापुर, विरेगाव, भायडी, फत्तेपूर, गोकुळ, सिपोरा बाजार, केदारखेडा व परिसरातील कांदाबीज उत्पादन व गावराण आंब्याचे देखील या अवकाळीत मोठे नुकसान झाले. 

नांदेड भागात शिजून वाळायला ठेवलेली हळद भिजली, केळीच्या बागा पडल्याने शेतकरी वर्गावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. तर बीड मधील गेवराई तालुक्यातील सिसरमार्ग येथे पत्रे उडून बैलाचा खांदा कापल्या गेला. सोबत अनेक भागात आंबे, मोसंबी, सहित उन्हाळी बाजरी व  ज्वारीचे देखील नुकसान झाले. 

सर्वाधिक हळद उत्पादन होणार्‍या मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यात देखील पावसाचे थैमान दिसून आले. ज्यात जवळपास १०० घरांना वादळी वार्‍याचा फटका बसला. तर अनेक शेतकर्‍यांची हळद या पावसात भिजली गेली. मराठवाड्याचा उर्वरित भाग धाराशीव, लातूर, परभणी मध्ये देखील मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे व फळबागांचे नुकसान होत अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले.

या अवकाळीने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश संबंधित जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी बीड येथे संगितले. तसेच निवडणूक आचार संहिता असल्याने मदत जाहीर करण्यास अडचणी आणि मर्यादा आहेत. तरीही प्रशासनाच्या वतीने शेतकर्‍यांना मदत करण्याची कार्यवाही केली जाईल असे ही मुंडे म्हणाले. 

टॅग्स :पाऊसवादळशेतीशेतकरीमराठवाडा