अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे राज्यात चांगलाच गारठा वाढला आहे. यंदा हिवाळ्यात थंडीपेक्षा पावसाळी वातावरणच अधिक होते. मागील सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपीटीने तापमानात घट झाली आहे. दोन ते तीन दिवसात पाऊस ओसरणार असून डिसेंबरपासून राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात रविवारी रात्रीपासून वादळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. विजांच्या कडकडाटासह अनेकांच्या शेतात पाणी साठले. रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेल्या खरीपासह रब्बीतील पिकेही आडवी झाली. नाशिक जिल्ह्यातील फळबागा धोक्यात आल्या. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून जनावरे दगावली.
डिसेंबरच्या सुरुवातीला थंडी..
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवसात पावसाची तीव्रता कमी होऊन हवेत कोरडेपणा जाणवणार आहे. अरबी समुद्र आणि गुजरातच्या किनारी भागात काही प्रणाली सक्रिय झाल्या आहेत. परिणामी बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण निवळणार असून डिसेंबरपासून थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
पुर्वेकडील अग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत २९ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर या कालावधीत वाहणा-या वा-यांमुळे डिसेंबर महिन्यात गारठा जाणवण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमानात लक्षणीय घट होण्याचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
दक्षीण अंदमान आणि मलाक्काच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. या चक्रीवादळाचा प्रवास अग्नेय दिशेने होणार आहे. महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होणार का, याचा अंदाज अद्याप वर्तवण्यात आला नाही.