आजपासून पुढचे चार दिवस मराठवाडा आणि विदर्भातील काही दिवस अवकाळी आणि गारपिटीची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आजपासून म्हणजेच शनिवार दि.१६ ते बुधवार दि.२० मार्च पर्यंतच्या पाच दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यातील जवळपास ८ जिल्ह्यांमध्ये अवकाळी आणि गारपिटीची शक्यता आहे.
विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच मराठवाड्यातील नांदेड अशा एकूण ८ जिल्ह्यात व लगतच्या परिसरात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी (वीजा, वाऱ्यासहित) पावसाची शक्यता जाणवते. तर ह्या पाच दिवसात वरील ८ जिल्ह्यात व लगतच्या परिसरात काही ठिकाणी (विशेषतः १९ मार्चला अधिक) गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
खान्देशातील ३ जिल्ह्यात मात्र केवळ ढगाळ वातावरण जाणवेल. तर महाराष्ट्रातील उर्वरित २५ जिल्ह्यात मात्र वातावरण कोरडे असण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी विचलित होऊ नये असेच वाटते.
महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर ह्या चार जिल्ह्यात मात्र उष्णतेत चांगलीच वाढ झालेली जाणवणार असून दुपारचे कमाल तापमान ३८ ते ४० तर कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात ३४-३७ डिग्री से. ग्रेडपर्यंतही पोहोचू शकते असे वाटते. मुंबईसह कोकणात मात्र अनपेक्षितपणे हा बदल जाणवणार नाही. तेथे दुपारचे कमाल तापमान केवळ सरासरीच्या खाली असून २८-३० डिग्री से. ग्रेड दरम्यान असू शकते, असे वाटते.
एका पाठोपाठ असे दोन पश्चिमी झंजावात, दि.१८ व २० मार्च (सोमवारव बुधवार) रोजी रात्री जम्मू काश्मीर, लेह-लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड अशा उत्तर भारतातील पश्चिमी हिमालयीन ३ राज्यात प्रवेशतील. त्याच्या परिणामातून तेथे २० ते २२ मार्च दरम्यानच्या ३ दिवसात पाऊस, बर्फवृष्टी, थंडी जाणवेल. परिणामी महाराष्ट्रात जरी कमाल तापमानात वाढ जाणवत असली तरी पहाटेचे किमान तापमानात कमालीची वाढ अजून जाणवणार नाही.
- माणिकराव खुळे Meteorologist (Retd.) IMD Pune.