Join us

राज्यातील धरणांमध्ये ७२% उपयुक्त पाणीसाठा, पाण्यासाठी होऊ शकतो संघर्ष; राजकारणही तापणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 3:10 PM

राज्यातील धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा हा मागच्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे भविष्यात पाण्यासाठी विभागांमध्ये संघर्ष होऊ शकतो.

राज्यातील एकूण सहा महसुली विभागातील प्रमुख पन्नास (५०) धरणांचा एकूण उपयुक्त पाणी साठा हा ७९३.११९ टी.एम.सी. इतका  १ सप्टेंबर २०२३ रोजी या ५० प्रमुख धरणांमध्ये सुमारे ५७७.७२५ टी.एम.सी. इतका उपयुक्त ( ७२.८४%) पाणीसाठा आहे. हा साठा मागच्या वर्षापेक्षा निश्चितच कमी आहे.

सर्वात जास्त कोकण महसूल विभागात (प्रमुख -३ धरणे)५०.०७० टी.एम.सी. म्हणजेच ९१.४९%  व सर्वात कमी मराठवाडा महसूल विभागात म्हणजेच(प्रमुख- ७ धरणे)७२.४५२ टी.एम.सी. म्हणजेच ४३.०३% इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. 

नाशिक व नागपूर विभागनाशिक महसूल विभागातील प्रमुख ८ धरणांचा प्रकल्पीय  एकूण उपयुक्त पाणीसाठा हा ८९.६१  टी.एम.सी. इतका असून आजमितीस तो ६४.६२ टी.एम.सी. म्हणजेच ७२.११%,तसेच नागपूर विभागातील प्रमुख ६ धरणांचा प्रकल्पीय एकूण उपयुक्त पाणीसाठा ९१.९५९ टी.एम.सी. इतका असून आजमितीस सुमारे ६४.१३३ टी.एम.सी. म्हणजेच ६९.७४%  इतका आहे. 

अमरावती विभागअमरावती महसूल विभागातील प्रमुख सहा (६) धरणांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा हा ४३.७६७ टी.एम.सी.इतका असून आजमितीस तो ३१.९९४ टी.एम.सी.(७३.१९%) इतका उपलब्ध आहे. 

पुणे विभागपुणे महसूल विभागातील १९ प्रमुख धरणांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा हा ३४४.७८३ टी.एम.सी. इतका असून आजमितीस तो २६४.४५६ टी.एम.सी. म्हणजेच ७६.७२% टक्के इतका आहे.

बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबईला दिलासादायकबृहन्मुंबई महानगरपालिकेस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पाच (५)धरणांमध्ये आजमितीस एकूण १७.७७३ टी.एम.सी. म्हणजेच ९८.०१% टक्के इतका पाणी साठा उपलब्ध आहे. 

 ठाणे महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारावी धरणात देखील सुमारे ११.८३९ टी.एम.सी. इतका उपयुक्त म्हणजे ९८.९३% टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या मोराबे धरणात आजमितीस ६.०९३ टी.एम.सी. म्हणजेच ९३.०३ % उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून हेटवणे धरणात देखील सुमारे ४.६१३ टीएमसी म्हणजेच ९०.०९% इतका उपयुक्त पाणी साठा उपलब्ध आहे. ही बाब बृहन्मुंबई ठाणे,व नवी मुंबई  महानगरपालिकेच्या दृष्टीने दिलासा देणारी आहे. 

उजनीमध्ये केवळ साडेआठ टीएमसी पाणी राज्यातील सर्वात जास्त पाणी साठवण क्षमता असलेल्या उजनी धरणात आजपर्यंत फक्त  ८.५४ टी.एम.सी. इतकाच म्हणजेच १५.९४%  इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला असून सोलापूर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रासाठी ही मोठी चिंतेची बाब निर्माण झाली आहे. 

कोयना धरणातून दिलासाकोयना धरणामध्ये आजमितीस ८०.९९ टी.एम.सी. इतका उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ८०.८९% इतकी असल्याने सिंचन क्षेत्रासाठी व वीज निर्मितीसाठी निश्चितच दिलासा देणारी बाब आहे.

मराठवाड्यासाठी चिंतेची बाब मराठवाड्यासाठी संजीवनी असलेल्या जायकवाडी धरणात मात्र आजमितीस २५.८३९ टी.एम.सी. म्हणजेच ३३.७५% टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने ही बाब सिंचनाच्या व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक दिसून येत आहे.

पाण्यासाठी होणार संघर्ष                                                       सद्य:स्थितीत पावसाने  नासिक ,नगर,( उत्तर महाराष्ट्र खानदेश) व मराठवाड्यासह एक ते दीड महिन्यापासून उघडीप दिली असून खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकरी वर्गास निश्चितपणे सोसावा लागणार आहे .अशीच पावसाची परिस्थिती यापुढेही कायम राहिल्यास निश्चितपणे नगर- नाशिक सह मराठवाड्यात दुष्काळाचे संकट निर्माण होणार असून समन्यायी पाणी वाटप कायदा- 2005 मधील तरतुदीनुसार नाशिक जिल्ह्यातून गोदावरी नदी धरण समूह व अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांमधुन जायकवाडी धरणात पाणी सोडणे क्रम प्राप्त होणार आहे. यामुळे निश्चितच नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी संघर्ष निर्माण होऊ शकतो. 

यावर असा करता येईल उपाय                                    घाट माथ्यावरील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राकडे वाहून जाणारे अतिरिक्त सुमारे ११५ टी.एम.सी. पाणी तातडीने गोदावरी नदी खोऱ्यामध्ये व तापी खोऱ्यामध्ये वळविणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी पाणी वळवण्याच्या महत्त्वकांक्षी योजनेची युद्धपातळीवर अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे.  घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसामुळे पश्चिमेकडे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी गोदावरी व तापी खोऱ्यात     वळविण्याच्या या महत्वाकांक्षी योजनेसाठी अंदाजे  रु 30 हजार कोटी रुपये पर्यंत खर्च अपेक्षित असून केंद्र सरकार व राज्य सरकार निश्चितपणे  ठोस पाऊल उचलून या विभागातील पाण्याची कायमस्वरूपी असलेली टंचाई दूर करण्यामध्ये महत्त्वाचें काम जनतेच्या दृष्टीने करु शकते. यासाठी गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची.

- हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता(से.नि.) जलसंपदा विभाग 

टॅग्स :धरणपाणीकपातपाणीजायकवाडी धरणकोयना धरण