गोवर्धन गावंडे
हिवरखेड : अकोला, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान धरणातून अकोला, बुलढाणा जिल्ह्यात ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदा चांगला पाऊस बरसल्याने धरणात १०० टक्के जलसाठा आहे.
त्यामुळे परिसरातील वारखेड, वारी, पिंपरखेड, हिंगणे, गोर्धा, रायखेड येथील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, धरणातून ४० दलघमी जलसाठा सिंचनासाठी राखीव करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सिंचनाकरिता पाणी मिळण्याचा मार्ग
मोकळा झाला आहे. यंदा सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर अवलंबून आहे. यंदा वान प्रकल्प १०० टक्के भरला असून, पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची सोय झाली आहे.
या पाणीपुरवठा योजनांनाही मिळतेय पाणी
रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा, मूग, भुईमूग, ज्वारी आदी पिकांची लागवड करण्यात येते. यावर्षी ४० दशलक्ष घनमीटर पाणी सिंचनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. अकोट, तेल्हारा ८४ खेडेगाव पाणीपुरवठा योजना २१.२३२ दशलक्ष घनमीटर, तेल्हारा शहर ३. ७५३ दशलक्ष घनमीटर, अकोट शहर ८ पॉइंट सात दशलक्ष घनमीटर, जळगाव जामोद ४.२ दलघमी, संग्रामपूर १४० गावांसाठी ८. ४५४ दशलक्ष घनमीटर पाणी राखीव ठेवण्यात येते. उर्वरित शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येते.
बागायती क्षेत्र वाढले
• मागील कित्येक वर्षापासून या भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी पाणीपुरवठा पूरक असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे.
• सिंचनासाठी पाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा झाला आहे. १९८४ मध्ये धरण बांधकाम सुरू झाले होते. त्यानंतर मागील कित्येक वर्षापासून सिंचनासाठी पाणी मिळत असल्याने परिसरात बागायती क्षेत्र वाढले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतातील सिंचनासाठी ४० दशलक्ष घनमीटर पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. मागणीनुसार पाणी सोडण्यात येईल. - नयन लोणारे, शाखा अभियंता, वान प्रकल्प.
हेही वाचा : Farmer Success Story : मराठवाड्याच्या देवगाव येथील अनंतारावांची फुलशेतीतून आर्थिक प्रगती