Veer Dam : मागच्या दोन दिवसांपासून पुणे आणि पश्चिम घाट परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील ताम्हिणी, लवासा, मुळशी, मावळ, पिंपरी, वेल्हे, भोर परिसरात जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून वीर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, निरा देवघर, भाटघर आणि गुंजवणे या तीन धरणांचे पाणी पुर्वेकडील निरा नदीवर असलेल्या वीर धरणात जाते आणि त्यानंतर ते पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी भागांत वितरीत केले जाते. तर सध्या या तीन धरणक्षेत्रातही चांगल्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वीर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
आज (दि. २५ जुलै) सकाळी मिळालेल्या माहितीनुसार वीर धरणाच्या सांडव्याद्वारे नदी पात्रात १३ हजार ९११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पावसाचा अंदाज आणि धरणात येणाऱ्या येव्यानुसार विसर्ग कमी किंवा अधिक करण्यात येईल अशी माहिती कार्यकारी अभियंत्याने दिली आहे.
दरम्यान, वाढत्या पाण्याचा अंदाजानुसार नागरिकांनी सतर्क रहावे, नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत अशा सूचना कार्यकारी अभियंता दि.म. डुबल यांनी दिल्या आहेत.