गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी रात्रीपासून दमदार आगमन केले. शुक्रवारपासून धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने झोडपून काढले.
यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने निरा, भाटघर आणि नाझरे, निरा देवघर, गुंजवणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
काही ठिकाणी सखोल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. तर गेल्या दोन दिवसांत निरा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे धरणे पुन्हा ओव्हरफ्लो झाल्याने निरा नदीपात्रात पाणी सोडले जात आहे.
सोमवारी पाणी सोडल्याने नातेपुते वालचंदनगर, नातेपुते-बारामती वाहतूक दिवसभर बंद केली होती. मंगळवारी काहीकाळ पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरू केली होती.
परंतु मंगळवारी सकाळी ११ वा. वीर धरणातून निरा नदीपात्रात ६३ हजार विसर्ग केल्याने रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत कुरबावी व वालचंदनगर पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद केली जाऊ शकते.
निरा नदी दुथडी भरून वाहत आहे. पुराचा धोका कायम असून, नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या वीर धरणात पाणी येत असल्याने गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सोमवारी (दि.२६) दिवसभर ३३,८०९ क्यूसेकने विसर्ग सुरू होता. सायंकाळच्या सुमारास विसर्ग वाढवण्यात आला. ११:३० वाजेपासून ६३,३४९ क्यूसेकने सुरू केला, तो दिवसभर स्थिर होता.
नीरा खोऱ्यात पावसाचा जोर वाढलासकाळी ११ वाजेपर्यंत २४,५३५ क्यूसेकने विसर्ग सुरू होता. निरा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत राहिला. परिणामी सकाळी ७ वाजता निरा देवधर धरणातून ५,१०५ क्यूसेकने, भाटघर धरणातून ९,३३१, तर गुंजवणी धरणातून ७३३ क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. नाझरे धरणातून ७३० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वीर धरणात १५,१६९ क्यूसेकने पाणी येत होते. त्यामुळे वीर धरणातून विसर्ग वाढवून तो सकाळी ३३,८०९ क्यूसेकने विसर्ग सुरू केला. यानंतर ११:३० वाजता वीर धरणातून ६३,५३५ क्यूसेकने विसर्ग केला.