नीरा : पुणे व सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या नीरा नदीवरील वीर धरणात मोठ्याप्रमाणावर पाणी येत असल्याने गेली दोन दिवस मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
रविवारी (दि. २५) रोजी दिवसभर ३३ हजार ८०९ क्युसेकने विसर्ग सुरू होता. सायंकाळच्या सुमारास विसर्ग वाढवण्यात आला नऊ वाजल्यापासून या हंगामातील विक्रमी ७१ हजार ३४९ क्युसेकने सुरू करण्यात आला, तो रात्रभर स्थिर ठेवला होता.
यामुळे नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरले होते. विसर्ग अधिक वाढवल्यास सखल भागात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असती. रविवारी सकाळी ०६ वाजता २४ हजार ५३५ क्युसेकने विसर्ग सुरू होता.
नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत राहिला परिणामी सकाळी ०७ वाजता नीरा देवधर धरणातून ५ हजार १०५ क्युसेकने, भाटघर धरणातून ९ हजार ३३१ क्युसेकने तर गुंजवणी धरणातून ७३३ क्युसेकने विसर्ग सुरू होता.
त्यामुळे वीर धरणात १५ हजार १६९ क्युसेकने पाणी येत होते. त्यामुळे वीर धरणातून विसर्ग वाढवून तो ३३ हजार ८०९ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. यानंतर दुपारी ०१ वाजता वीर धरणातून २४ हजार ५३५ विसर्ग करण्यात आला.
रात्री ०८.४५ वाजता ७१ हजार ३४९ क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे. या पावसाळी हंगामातील हा विक्रमी विसर्ग असल्याचे बोलले जात आहे. सन २०२२ साली विक्रमी पाऊस झाल्याने वीर धरणातून तब्बल १ लाखांहून अधिक क्युसेकने विसर्ग करण्यात आला होता.
वस्तीत शिरले पाणीनीरा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्यावर सखल भागात पाणी शिरत असते. वीर धरणातून नदी पात्रात ७० हजार क्युसेकने सुरू झाला की नदीकाठच्या लोकवस्तीत पाणी येण्याचा धोका असतो. २०२२ साली १ लाख क्यूसेकने विसर्ग करण्यात आला होता. त्यावेळी नौरा शहरातील प्रभाग एकमधील रेल्वेलाइन शेजारील वस्तीत पाणी शिरले होते. रविवारी वीर धरणातून ७१ हजारांहून अधिकचा विसर्ग झाल्यावर या भागातील झोपड्यांमध्ये पाणी शिरले होते, तर नदीकाठच्या स्मशानभूमीच्या चोहोबाजूंनी पाण्याने वेढा दिला होता.