Vidarbha Weather Update :
नरेंद्र जावरे :
चिखलदरा (अमरावती) : विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखला जाणारा चिखलदरा आता थंडीने गारठला आहे. सध्या या ठिकाणी वातावरणात झालेल्या बदलांमुळे थंडी वाढली आहे. पारा ९ अंशावर आला आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आणि मेळघाटातील घनदाट जंगलात वसलेल्या चिखलदऱ्यात सध्या सकाळच्या वेळी धुके बघायला मिळत आहे. चिखलदऱ्याचे वातावरण सध्या अल्हाददायक झाले आहे. अंगात हुडहुडी भरणारी थंडी सध्या चिखलदऱ्यात आहे.
स्थानिक नागरिकांसह पर्यटक गारव्यापासून बचाव करण्यासाठी गरम कपडे आणि दिवसाही शेकोटी पेटू लागले आहेत. हळूहळू पर्यटकांची गर्दी आता पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या चिखलदऱ्याकडे वळताना दिसत आहे.
विदर्भाचे नंदनवन चिखलदरा या पर्यटनस्थळावर कडाक्याची थंडी पडू लागली आहे. हा संपूर्ण परिसर गारठला आहे. पारा घसरल्याने स्थानिकांसह पर्यटकांना दिवस व रात्री गरम कपड्यांचा शेकोट्यांचा आधार घेत ऊब आणण्यासाठी घ्यावा लागत आहे.
मागील तीन दिवसांपूर्वी ९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेला पारा आता रात्रीच्या वेळी १० ते ११ अंश सेल्सिअसवर स्थिर आहे. मागील २० दिवसांपासून कडाक्याची थंडी पडू लागली आहे.
शहरी भागातही थंडी असताना विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा पर्यटन स्थळसुद्धा गार वाऱ्याने गारठले आहे. समुद्रसपाटीपासून ३ हजार ६०० फूट उंचावर असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर थंडीमुळे पर्यटकांची संख्या काही अंशी रोडावली आहे.
येत्या काही दिवसांत विविध शाळा, महाविद्यालयाच्या सहलींची संख्या नाताळ व नवीन वर्षानिमित्त मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने पर्यटकांची संख्यासुद्धा मोठ्या आहे.
गुलाबी थंडीत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी प्रमाणात आहे. नोव्हेंबर मध्यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्यांपर्यंत ती संख्या मोठ्या प्रमाणात राहते, हे विशेष आहे.
चिखलदरा पर्यटनस्थळावर मागील आठवडाभरापासून पहाटे व मध्यरात्री पारा ९ ते १३ डिग्री सेल्सिअसपर्यंत राहत आहे. त्यामुळे दिवसभर थंड वाहणारे वारे, हुडहुडी भरणारी थंडी; परिणामी अंगात गरम कपडे आणि शेकोट्यांजवळ ऊब घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे. पावसाप्रमाणे थंडीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळावर पावसाळ्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात.
कोलकास, सेमाडोह गारठले
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोलकास व सेमाडोह पर्यटनस्थळांवरसुद्धा महाराष्ट्र व मध्य प्रदेशासह देशभरातून मोठ्या प्रमाणात आलेले पर्यटक भेट देतात. जंगल सफारी, हत्ती सफारीसाठी पर्यटकांची पहिली पसंती आहे. चिखलदरा पर्यटनप्रमाणे सिपना नदीच्या तीरावरील ही दोन्ही पर्यटनस्थळे गारठली आहेत.