एखादा दिवस, महिना, वर्ष हे थंड किंवा उष्ण किंवा समशीतोष्ण हे हवामान शास्त्राच्या भाषेत सांगायचे झाल्यास, पहाटेचे किमान व दुपारी ३ चे कमाल तापमान यांची बेरीज करून काढलेल्या सरासरी तापमानाची, त्या ठिकाणच्या आतापर्यंत उपलब्ध सरासरी तापमानाच्या आकड्यांशी तुलना करून बोध केला जातो.
जेव्हा जगात माफक किंवा औद्योगिकीकरणाला नुकतीच सुरुवात झाली अशा १८५१ ते १९०० या दरम्यानच्या काळात प्रदूषण नव्हते की ज्याला हरित गृह उत्सर्जने म्हणतात तेही नव्हते. त्यावेळी संपूर्ण पृथ्वीतलावरील वार्षिक सरासरी तापमान फार कमी होते.
ते वार्षिक सरासरी तापमानसंदर्भासाठी गृहीत धरून, आज जगाचे वार्षिक सरासरी तापमान किती आहे, याची तुलना केली जाते. त्यावरून कोणते वर्ष उष्ण आहे, हे ठरविले जाते.
त्या वेळच्या (१९व्या शतकातील) तापमानाइतके किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त तापमान वाढ १.५ डि.सें. ग्रेड अधिक तापमानापर्यंत रोखण्याचा संकल्प १९६ प्रतिनिधी असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत १२ डिसेंबर २०१५ ला फ्रान्स, पॅरिसमध्ये सोडण्यात आला.
वातावरण बदलावर काम करणाऱ्या या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या कराराला 'पॅरिस करार' म्हणतात. तो करार जगातील सर्व सहभागी राष्ट्रांना कायदेशीर बंधनकारक केला गेला.
थोडक्यात २०१९ च्या पातळीतील जगाचे प्रदूषित उत्सर्जन कायम ठेवण्यासाठी हे उत्सर्जन २०३० पर्यंत ४२ टक्क्यांपर्यंत खाली आणणे गरजेचे आहे. म्हणजेच सरासरीच्या १.५ डि.सें. झालेली वाढ कायम ठेवण्याचा प्रयत्न शक्य होऊ शकतो.
हे उद्दिष्ट जर साध्य करायचे असेल आणि जागतिक तापमान वाढ रोखायची असेल तर हरितगृह उत्सर्जने अर्थात कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नाइट्रस ऑक्साइड, फ्लूर्रिनोटेड गॅसेससारखे प्रदूषित गॅसेस या विषारी वायूंचे उत्सर्जन थांबविणे गरजेचे आहे, यावर पॅरिस करारात सगळ्या देशांचे एकमत झाले.
२०२४ चे जगाचे वार्षिक सरासरी तापमान हे २५.७५ डि. सें. या जागतिक सरासरी तापमानापेक्षा ०.६५ डि.से.ने अधिक जाणवले. त्यापूर्वी २०१६ मध्ये हे तापमान ०.५४ डि.से.ने अधिक होते. त्यामुळेच ८ वर्षात झालेली ०.११ डि.सें.ची तापमानवाढ ही प्रचंड समजली जात आहे.
मुंबईत तापमानवाढ का?१) मुंबईतील तापमानाचा विचार केला तर मुंबई व उपनगरात दाबाचे क्षेत्र कायम स्थिर व टिकून राहते. नेहमीच्या दैनिक प्रक्रियेनुसार दिवस तापणे व रात्री जमिनीकडून आकाशात फेकल्या जाणाऱ्या उष्णतेच्या दीर्घलहरी उत्सर्जनांना या उच्च दाबामुळे अटकाव होऊन उत्सर्जनेही कमी प्रमाणात घडून येतात. त्यामुळे मुंबई-ठाणे परिसरात हवेच्या पार्सलमध्ये उष्णता कोंडून राहते आणि याच कारणामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतदेखील गेल्या काही वर्षात तापमान खूप अधिक नोंदवले जात आहे.२) मुंबई हे काँक्रीटच्या विळख्यातील प्रदूषित शहर आहे. पूर्वमोसमातील उच्च दाब क्षेत्र कालावधीत, शहरातील प्रदूषणातील धूर, धूलिकण शहर व उपनगरातील वातावरणातून वेगाने बाहेर पडत नाही.३) आकाशातही त्याचे उर्ध्वगमन होऊन उत्सर्जन होत नाही. पर्यायाने आधीच 'वारा खंडितता' प्रणालीतून वाढलेल्या उष्णतेत मानव निर्मित उष्णतेची भर पडते. मुंबईतील उष्णतेचे खरे तर हेच मुख्य कारण जाणवते
राज्यातील थंडीचे काय?■ संपूर्ण महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात पहाटे ५चे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक जाणवेल.■ थंडीच्या दृष्टीने तापमानाचा पारा हा सरासरीपेक्षा खाली घसरणे गरजेचे. परंतु हे तापमान पुढील तीन महिन्यात सरासरीपेक्षा अधिक असण्याचा अंदाज म्हणजे तापमानवाढीलाच पूरक आहे.■ जानेवारीत खान्देश व उत्तर विदर्भातील जिल्ह्यांत थंडीच्या लाटेचा कालावधी हा सरासरीपेक्षा अधिक तर उर्वरित जिल्ह्यांत सरासरी इतका जाणवण्याचा अंदाज आहे.
समुद्राचे पाणी थंड न झाल्याचा परिणाम१) आता २०२४ मध्ये झालेल्या तापमान वाढीची कारणमीमांसा केली तर असे दिसून येते की, जागतिक स्तरावर तापमानावर परिणाम करणारे एल निनो व ला निना या दोन फॅक्टरपैकी एल निनो साउथ ओसीलेशन्स हा संपूर्ण वर्षात तटस्थ राहिला.२) पावसासाठी पूरक असणारा अपेक्षित ला निना प्रशांत महासागरात अवतारलाच नाही. आणि अजूनही तो अवतरलेला नाही, म्हणजेच संपूर्ण वर्षात समुद्री पृष्ठभागीय पाण्याच्या तापमानात अपेक्षित थंडावा आढळला नाही. त्यामुळे जागतिक पातळीतील उष्णता टिकून राहिली.३) २०२४ या वर्षात विशेषतः ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात थंडीचा कालावधी असूनही कमाल व किमान तापमानात वाढ झालेली जाणवली. गेल्या काही वर्षांपासून पावसाळी दिवसांची संख्या कमी होऊ लागली आहे.४) मान्सूनचा पॅटर्न बदलत चालला असल्याचे दिसून येत आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या जानेवारी ते मार्च २०२५च्या तिमाही अंदाजात वायव्य भारतात व ईशान्येकडील राज्यांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी, तर उर्वरित देशात सरासरीपेक्षा अधिक राहील, असे म्हटले आहे. महाराष्ट्रात जानेवारीत पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा अधिक राहील, असे दिसते.
माणिकराव खुळेज्येष्ठ सेवानिवृत्त हवामानतज्ञ