Join us

कोयनेतून विसर्ग बंद; कृष्णाकाठी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2023 8:37 AM

कोयना धरण व्यवस्थापनाने २२ डिसेंबरपासून पाणी सोडण्याचे बंद केले आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत कृष्णा नदीपात्र कोरडे पडण्यास सुरुवात होणार आहे.

कोयना धरण व्यवस्थापनाने २२ डिसेंबरपासून पाणी सोडण्याचे बंद केले आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत कृष्णा नदीपात्र कोरडे पडण्यास सुरुवात होणार आहे. पिण्याच्या पाणी योजनांसह शेतीच्या पाणी योजना आणि टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करण्यावर मोठा परिणाम होणार आहे. म्हणून कोयनेतून पुन्हा विसर्ग सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदारांची भूमिका काय असणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कोयना धरणातून दर वीस दिवसांतून १.६ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी सोडण्याचे सूत्र आहे. १.६ टीएमसी पाणी आल्यानंतर पाच दिवस धरणातून विसर्ग बंद ठेवून पुन्हा १.६ टीएमसी पाणी सोडले जात आहे. पण, सध्या कोयना धरणाच्या पाणी व्यवस्थापनात राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे पाणी सोडण्याचे विस्कळीत झाले आहे. यामुळेच कोयना पाण्यावरून सूत्रच धरणाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच पाणीप्रश्न पेटला आहे. कोयनेचा विसर्ग बंद करून चार दिवस झाले, विसर्ग पुन्हा कधी सुरू होईल, याची खात्री अधिकाऱ्यांनाही नाही. यामुळे कोयनेतून पाणी सोडण्यावरून पुन्हा राजकीय वाद पेटणार का, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगली आहे.

कोयनेचे अधिकारी म्हणतात, मागणीच नाहीसांगली पाटबंधारे विभागाची सिंचनाची मागणी कमी झाल्यामुळे कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट दि. २२ डिसेंबरपासून बंद केले आहे. पाटबंधारे विभागाकडून पुन्हा पाण्याची मागणी आल्यानंतरच पाणी सोडण्यात येईल, असे कोयना धरण व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पीक वाळतानाही आवर्तन लांबले- खानापूर, आटपाडी तालुक्यातील रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा पिकांना पाणी नसल्यामुळे वाळू लागले आहेत.- शेतकऱ्यांनी मागणी करूनही टेंभू योजना सुरू करण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.- खासदार, आमदार तरीही लक्ष घालून टेंभू योजना सुरू करणार आहेत का, असा सवाल दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

पालकमंत्री लक्ष कधी घालणार? सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई कोयनेतून वारंवार पाणीबंद करत आहेत. या प्रश्नावर सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे कधी लक्ष घालणार आहेत. प्रत्येकवेळी कृष्णा नदी कोरडी पडल्यानंतर शेतकऱ्यांनीच रस्त्यावर यायचे का? कधी तरी पाणीप्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन खाडे यांनी शासनाकडून पाणीप्रश्न कायमचा सोडविला पाहिजे, असे मत आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केले. तसेच रब्बी पिके वाळत असल्यामुळे टेंभू योजना तातडीने सुरू करा, असेही ते म्हणाले.

कोयना धरणातून १.६ टीएमसी पाणी सोडल्यानंतर पाच दिवस धरणातून विसर्ग बंद केला जात आहे. त्यानंतर पुन्हा १.६ टीएमसी पाणी सोडण्याची पध्दत आहे. त्यानुसार कोयना धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याची गरज आहे. कृष्णा नदी कोरडी पडण्याची वाट पाहण्याची गरज नाही. सांगली पाटबंधारे विभागानेही पाण्याची गरज असल्याबद्दल कोयना धरण व्यवस्थापनाला कळविले पाहिजे. - विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता

टॅग्स :कोयना धरणधरणसांगलीशेतकरीशेतीपीकदुष्काळपाणी