Join us

जायकवाडीसाठी पाणी घेणार मोजून? नगर, नाशिकला मराठवाड्यातील अभियंत्यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 11:48 AM

जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) अखेर नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामासाठीही काही प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे.

नाशिक आणि नगर येथील धरणांमधून अखेर जायकवाडी धरणांसाठी काल रात्री ११ वा. पासून पाणी सोडण्याला सुरूवात झाली आहे. दरम्यान गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे वरिष्ठ अभियंता नाशिक आणि नगरच्या संबंधित धरणांवर पोहोचले असून आवश्यक पाणी सोडण्याची निश्चिती करण्याचे काम ते करणार आहेत. एकूण ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे निर्देश असून त्याप्रमाणे वरच्या धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडले जाते की नाही याची खात्री व देखरेख करण्याचे व हे पाणी मोजून घेण्याचे काम मराठवाड्यातील हे अभियंते करणार असल्याचे समजते.

शुक्रवारी रात्री ११ पासून भंडारदरा निळवंडे धरण समुहांतून  १०० क्युसेक्स तर दारणा धरणातून १९२ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.

कुठल्या धरणातून किती पाणी 

  • मुळा (मांडओहोळ व मुळा) प्रकल्पातून २.१० टीएमसी,
  • प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर)प्रकल्पातून ३.३६ टीएमसी,
  • गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी), ०.५ टीएमसी,
  • गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून २.६४३ टीएमसी
  •  एकूण ८.६०३ टीएमसी  

हेही वाचा :

मुळा, भंडारदरा धरणातून जायकवाडीत सोडणार पाणी

१०० टीएमसी पाणी हा अत्यल्प विसर्ग असला, तरी आज सायंकाळपर्यंत हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येऊन किमान ५ हजार टीएमसी पर्यंत केला जाईल अशी माहिती ‘लोकमत ॲग्रो’ला जलसंपदा विभागाशी संबंधित विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. किमान ५ हजार किंवा जास्त क्युसेक्सने विसर्ग केला, तरच हे पाणी जायकवाडीला लवकरच पोहचू शकेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.

 

पाणी सोडले... गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने रात्री ११ वाजता जायकवाडी धरणाच्या दिशेने पाणी सोडले आहे. दारणा या धरणातून १९२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. निळवंडे धरणातून देखील पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. - सं. रा. तिमनवार, कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ

टॅग्स :जायकवाडी धरणपाणीशेती