Join us

सांगलीच्या सिंचनासाठी कोयनेतून तिसऱ्यांदा पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 8:08 AM

सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयनेच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून १०५० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.

दुष्काळाची स्थितीमुळे कोयना धरणातून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयनेच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून १०५० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. पावसाळ्यापासून सांगलीतील सिंचनासाठी आतापर्यंत तिसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले आहे. तर धरणात सध्या ८५ टीएमसीच साठा शिल्लक आहे.

कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. या पाण्यावर पिण्याचे पाणी, सिंचन योजना आणि वीजनिर्मितीही अवलंबून आहे. मात्र, यंदा या धरणक्षेत्रात पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ९४ टीएमसीपर्यंतच पोहोचला होता. त्याचबरोबर साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातही पाऊस कमी आहे. यामुळे धरणांतून पाणी सोडण्याची मागणी होत आहे. आताही सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी  करण्यात आली.

कोयना धरणातून शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास पाणी सोडण्यात आलेले आहे. पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून १०५० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी कोयना नदीपात्रात जात आहे. तर मागील महिन्यातही सांगलीतील सिंचनासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. सध्या सांगलीतील सिंचनासाठी दोन टीएमसी पाणी सोडणार आहे, यामुळे आणखी काही दिवस विसर्ग सुरू राहील.

टॅग्स :धरणसांगलीशेतीपाटबंधारे प्रकल्प