Water Issue : वाढत्या तापमानाने भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात असून, साठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. सूर्य आग ओकू लागल्यामुळे पाण्याची टंचाई आणि जनावरांसाठी वैरण नसल्यामुळे शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ येत आहे. (Water resources)
भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, मलकापूर तालुक्यातील जलाशयातील साठाही दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पाण्याची तीव्र समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Water resources)
बरेचसे पाझर तलाव कोरडे पडल्यामुळे ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये आतापासूनच पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट होण्याची शक्यता आहे. (Water resources)
पाण्याचे साठे संपुष्टात येण्याची चिन्हे दिसून येत असल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण होण्याचे संकेत आहेत. (Water resources)
गावाच्या शिवारात जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. हीच परिस्थिती वैरणाची झाली आहे.पाणी समस्या निवारण्यासाठी शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत असले तरी बऱ्याचशा ठिकाणी आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकरी चिंताग्रस्त
* वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्याजवळ जनावरांना पिण्यासाठी पाणी व वैरण नाही. त्यामुळे जनावरांना द्यावे तरी काय, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.
* अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामात शेतीच्या लागवडीसाठी लागणाऱ्या बियाणे खरेदीला पैसे नाहीत. त्यातच ही समस्या निर्माण झाली आहे.
वन्यप्राण्यांची गावाकडे धाव, नागरिकांमध्ये भीती!
* मलकापूर तालुक्यातील पसरलेल्या जंगलातील पाण्याचा साठा संपुष्टात येत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी जंगलाला लागून असलेल्या गावात प्रवेश करणे सुरू केले आहे.
* या भागात हरीण, रोही, कोल्हे, रानगाई, रानडुकरे आदी वन्य प्राणी गावात शिरू लागल्यामुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
* पाण्यासाठी गावाकडे धाव घेणारे जंगली जनावरे गोठ्यात बांधून असलेल्या गुरांवर हल्ला करीत आहेत. त्यामुळे गावकरी अधिकच भयभीत झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.