राज्यभरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे विदर्भातील धरणांमधील पाणी पातळी वाढली असून अमरावती,यवतमाळ, वर्ध्यातील धरणांची दारे उघडण्यात आली आहेत. पावसाची संततधार सुरूच असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 48 तासात 72 महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीने पश्चिम विदर्भातील नदी नाल्यांना पूर आला आहे. याशिवाय बांध फुटणे, शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अमरावतीतील धरणाचे नऊपैकी पाच दरवाजे उघडले असून 50.72 घ.मी.प्र.से. पाणी पूर्ण नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तसेच यवतमाळ मधील बेंबळा धरणातून 700 घमीसे विसर्ग करण्यात येत आहे. अप्पर वर्धा धरणाची दहा दारे उघडण्यात आली आहेत.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी वाढली असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना नदीपात्र न ओलांडण्याच्या आवाहन करण्यात आले आहे.
अकोल्यात गेल्या 24 तासात सरासरी 37.9 मिलिमीटर पाऊस झाला नदी नाल्यांना पूर आल्याने रस्ते बंद झाले. पुरात एक व्यक्ती वाहून गेली असून शोधकार्य सुरू आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे. काल मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील वाघाडी नदीला पूर आला. ५०-६० नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे जीवनमान विस्कळीत झाले. गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नद्यांना पुर आले आहे. तर शेतात देखील पाणी साठले आहे.