Join us

परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रासाठी जायकवाडीतून सोडले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 9:28 AM

सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. टप्प्याटप्प्याने पाण्याचा...

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रासाठी सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. टप्प्याटप्प्याने पाण्याचा वेग वाढवला जाणार असून, जवळजवळ २० दलघमी पाणी खडका बंधाऱ्यात १ एप्रिलपर्यंत सोडण्यात येणार असल्याची माहिती जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली.

जायकवाडी धरणाची पाणी पातळी सोमवारी २३.९८ टक्क्यांवर पोहोचली आहे. परळी येथील औष्णिक केंद्रातून वीज निर्मितीकरिता जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यातील खडका बंधाऱ्यात पाणी सोडले जाते. सध्या खडका बंधाऱ्यातील पाणी पातळी कमालीची घटल्याने परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती कधीही बंद पडू शकते. त्यामुळे वीजनिर्मिती अखंड सुरू राहण्यासाठी सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास डाव्या कालव्यातून १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे वीज निर्मिती अखंड सुरू राहणार आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी २ एप्रिलपासून डाव्या कालव्याचे रोटेशन सुरू करणार असून, यामुळे पशुधन जगवण्यासाठी मदत होईल. उजव्या कालव्याचे नियोजन अद्याप झालेले नाही, मात्र एप्रिलमध्ये उजव्या कालव्यालाही पाणी सोडणार असून, यामुळे पशुधन जगवण्यासाठी मदत होईल, असे कार्यकारी अभियंता जाधव म्हणाले.

टॅग्स :जायकवाडी धरणपाणीबीडभारनियमन