Join us

जायकवाडीतून दोन्ही कालव्यांत रब्बीसाठी सोडले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 3:18 PM

मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या १ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील सिंचनाची सोय झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यातून रब्बी हंगामासाठी गुरुवारी पाणी सोडण्यात आल्याने मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या १ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील सिंचनाची सोय झाली आहे. उजव्या कालव्यातून १५ दिवस तर डाव्या कालव्यातून एक महिना पाणी सोडण्यात येणार असल्याचे शाखा अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

मराठवाड्यात गतवर्षी पाऊस कमी झाल्याने जायकवाडी धरणात म्हणावा तसा पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे धरणाची स्थिती बिकट आहे. पावसाळ्यात धरण जेमतेम अर्धे भरले.आहे. अशात खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हाती आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांची मागणी होती. त्यानुसार जायकवाडीतून पाणी सोडण्याचा निर्णय जायकवाडी प्रशासनाच्या वतीने घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी धरणातून डाव्या आणि उजव्या या दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे उजव्या कालव्याअंतर्गत ४१ हजार ६८२ हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.

यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ हजार ४३२ हेक्टर, बीड जिल्ह्यातील ३७ हजार ९६० हेक्टर तर अहमदनगर जिल्ह्यातील २२ हजार ९० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. उजवा कालवा हा १३२ किलोमीटरचा आहे. तसेच २०८ किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्यांतर्गत येणाऱ्या १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर क्षेत्रालाही या पाण्याचा फायदा होणार आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ हजार ६२० हेकटर, जालना जिल्ह्यातील ३६ हजार ५८० हेक्टर तर परभणी जिल्ह्यातील ९७ हजार ४४० हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, अहमदनगर या पाच जिल्ह्यांतील एकूण १ लाख ८३ हजार ३२२ हेक्टरला या पाण्याचा फायदा होणार आहे, असे शाखा अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

नाथसागर धरणातून उजव्या आणि डाव्या दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात आले आहे. या कालव्यांद्वारे १ लाख ८३ हजार ३२२ हेक्टर क्षेत्राला पाण्याचा फायदा होतो. रब्बीसाठी दोनच पाणी पाळ्या निश्चित केल्या होत्या. त्या सोडण्यात आल्या आहेत. पिण्यासाठी दोन्ही कालव्यांतून एप्रिलमध्ये पाणी सोडण्यात येईल. शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य वापर करावा.-प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता

पाणीपातळी घटू लागली

जायकवाडी धरणातून पाण्याचे दररोज बाष्पीभवन होत आहे. सध्या धरणात ३७.४६ टक्के पाणीसाठा आहे. २०२३ मध्ये यावेळेला ८१ टक्के पाणी होते. । उन्हाळ्यात दुपटीने पाण्याचे बाष्पीभवन होणार असल्यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होणार आहे. अशात धरणातील पाणी पिण्यासाठी, सिंचनासाठी आणि उद्योगासाठी देण्याचे नियोजन जायकवाडी प्रशासनाला करावे लागणार आहे

टॅग्स :जायकवाडी धरणधरणपाणी