माजलगाव धरणातून उजव्या कालव्यावर ३.५४ दलघमी पाणी सोडण्यात आले होते. या पाण्यातूनच ०.५० दलघमी पाणी गोदावरी नदीच्या पात्रातील तारुगव्हाण बंधाऱ्यात २ एप्रिलला सोडण्यात आले; मात्र ८ एप्रिल उजाडले तरी बंधाऱ्यात दाखल झाले नसल्याने कधीपर्यंत पाणी दाखल होईल असा सवाल विचारला जात आहे.
पाथरी तालुक्यातील तारुगव्हाण, मुदगल, ढालेगाव हे तीनही बंधारे कोरडेठाक पडले आहेत. गोदावरी नदीचे पात्र पूर्ण आटले. या भागात पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे नदीपात्रासह बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्याची मागणी मागील काही दिवसांपासून जोर धरू लागली. दरम्यान, तारुगव्हाण बंधाऱ्यात माजलगाव धरणातून पाणी सोडण्याबाबत निर्णय झाला. २ एप्रिलला धरणातून ३.५४ दलघमी पाणी कॅनॉलद्वारे सोडण्यात आले.
माजलगाव तालुक्यातील कॅनॉलमधून वड्या आणि नदीतून थेट पाथरी तालुक्यातील तारुगव्हाण बंधाऱ्यांमध्ये ०.५० दलघमी पाणी येणार होते. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, पशुधनांना मोठा दिलासा मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. पाणी सोडून सात दिवस लोटले अद्यापही बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा थेंबही दाखल झाला नाही. यामुळे या बंधाऱ्यात पाणी येणार का नाही या भागातील नागरिकांना आता प्रश्न पडू लागला आहे.
प्रतीक्षा कायम
यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यातील जलसाठ्यांनी तळ गाठला. कूपनलिका, विहिरींची पाणीपातळी घटली आहे. नदीसह बंधारे कोरडेठाक पडले. अशा स्थितीत पाणी सोडण्यात आले खरे मात्र, प्रत्यक्षात सात दिवसांचा कालावधी उलटूनही पाणी दाखल झाले नसल्याने ग्रामस्थांना या पाण्याची प्रतीक्षा आहे.
जायकवाडी विभाग अनभिज्ञ ?
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून सध्या परळी थर्मलसाठी पाणी सोडण्यात आले आहे. थर्मलचे पाणी आटोपल्यानंतर ढालेगाव बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे; मात्र नेमके केव्हा पाणी येणार याबाबत जायकवाडी विभाग अनभिज्ञ असून एप्रिलच्या शेवटी पाणी दाखल होईल अशी शक्यता आहे.