पुण्यातील जलस्त्रोत आटू लागले असून धरणांमध्ये केवळ २३.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. दरम्यान, वर्ल्ड पॉप्यूलेशन रिव्हूनुसार पुणे शहरातील लोकसंख्या साधारण ७३ लाख एवढी आहे. २०३० पर्यंत ही लोकसंख्या ८० लाखांच्या वर जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पाणी कसे पुरणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे विभागात ३५ मोठे प्रकल्प असून ५० मध्यम व ६३५ लघू धरण प्रकल्प आहेत. एकूण विभागात आता २३.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.
पुणे विभागात कोल्हापूर, पुणे व सोलापूर, सातारा, सांगली या शहरांचा समावेश होतो. केवळ पुण्यासाठी २२ लहान मध्यम मोठी धरणे आहेत. त्यातील ६ धरणांमधील पाणीसाठा १० टक्क्यांच्या खाली गेला आहे. उर्वरित बहुतांश धरणे ३० टक्क्यांच्या खाली आहेत.
दरम्यान, पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचे वारंवार आवाहन केले जात असून तापमानाच्या झळांसह पाणीटंचाईचे चटकेही नागरिकांना सहन करावे लागत आहेत. शिक्षण, नोकरीकरता पुण्यात स्थलांतर करण्याचे प्रमाण अधिक असून स्पर्धा परीक्षा अशा अनेक कारणांमुळे स्थलांतर वाढले असून पाणीपुरवठ्याच्या समस्या वाढण्याचा अंदाज आहे.