Join us

Almatti Dam अलमट्टीमधील पाणीसाठा केंद्रीय जल आयोगाच्या निकषांनुसार ठेवावा लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 12:49 PM

हिप्परगी बंधारा तसेच अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याबाबत केंद्रीय जल आयोगाने घालून दिलेल्या निकषाचे पालन न करता जास्तीत जास्त पाणीसाठा ठेवल्याने कोल्हापूर व सांगलीला महापुराचा फटका बसतो.

कोल्हापूर : हिप्परगी बंधारा तसेच अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याबाबत केंद्रीय जल आयोगाने घालून दिलेल्या निकषाचे पालन न करता जास्तीत जास्त पाणीसाठा ठेवल्याने कोल्हापूर व सांगलीला महापुराचा फटका बसतो.

हे टाळण्यासाठी कर्नाटकमधील या दोन्ही महत्त्वाच्या जलाशयांमधील पाणीसाठ्याबाबत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जावे, त्यावर महाराष्ट्राचे संनियंत्रण असावेत, पावसाळ्यात सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने खुले करावेत, कृष्णा खोरे नदी संघटनेची स्थापना करावी अशी मागणी सांगलीतील कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने जिल्हधिकारी अमोल येडगे यांच्याकडे शुक्रवारी केली.

समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, सुयोग हावळ, संजय कोरे यांच्या शिष्टमंडळाने याबाबत जिल्हाधिकारी येडगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी समितीच्या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करावा त्यानुसार पाणीसाठ्याचे नियोजन करावे, त्यासाठी कर्नाटक पाटबंधारे विभागाशी चर्चा करावी असा सूचना कोल्हापूर पाटबंधारे विभागाला दिल्या.

समितीने पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील बरगे, दारे तळातून पूर्ण क्षमतेने खुले करून नदीला मोकळे वाहू द्यावे. महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये समन्वय असावा, कृष्णा खोरेचे भाग असलेल्या सर्व राज्यांची केंद्रीय प्रतिनिधित्व असलेलेली कृष्णा खोरे नदी संघटनेची स्थापना व्हावी. पाणीसाठ्यावर आंतरराज्यीय बैठका व्हाव्यात.

राजापूर बंधाऱ्यावरून जाणारा विसर्ग अलमट्टी धरणातून खाली सोडावा, कर्नाटककडून हे होत नसल्याने कृष्णा नदीच्या पूर वहन क्षमतेत मानवनिर्मित अडथळे येऊन पाण्याला फुगवटा येतो व महापुराची स्थिती होते असे मत नोंदवले. यावेळी धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, महेश जाधव, एकनाथ माने, महादेव काळे आदी उपस्थित होते.

अलमट्टी धरणातील अपेक्षित पाणीसाठा१ ते १५ जून - ५०८.२२ मीटर१६ ते ३० जून - ५१३.६ मीटर१ ते १५ जुलै - ५१७.११ मीटर१६ ते ३० जुलै - ५१३.६ मीटर३० ऑगस्ट -  ५१७ मीटर

हिप्परगी बंधाऱ्याचा परिणाम• जमखंडी (ता. बागलकोट) येथील हिप्परगी जलसिंचन प्रकल्पात ६ टीएमसी जलसाठा होतो. त्याची पूर्ण क्षमतेची पातळी ५२४.२७ मीटर असून त्यात ५३१.४० मीटर पाणी साठा करू शकतात.• महाराष्ट्रातील शेवटचा राजापूर बंधारा हिप्परगीपासून ९२ किलोमीटरवर असून त्याची उंची ५२३.५० मीटर व नदी पात्राची उंची ५१८.९७ मीटर आहे.• बंधाऱ्यातील पाणी १ जुलै आल्यावरदेखील सोडले जात नाही, त्यामुळे शिरोळ बंधारा भरून तेरवाड बंधाऱ्याच्या खालील बाजूस पाणी थांबते त्यामुळे पंचगंगेच्या वरच्या भागात राजाराम बंधाऱ्यापर्यंत पाण्याला फुग येते.

अधिक वाचा: मान्सून आला.. मान्सून आला.. नक्की मान्सून म्हणजे आहे तरी काय? कसा पडतो पाऊस

टॅग्स :धरणपाणीकोल्हापूरकर्नाटकपूरपाऊस