कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील सहा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून अपेक्षित असा पाऊस झालेला नाही; मात्र झालेल्या पावसामुळे जुन्नर तालुक्यातील वडज, येडगाव, माणिकडोह, पिंपळगाव जोगा आणि चिल्हेवाडी आणि आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरण या सहा धरणांत ४.६ टीएमसी पाणीसाठा नव्याने आला असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सद्यःस्थितीत सर्व धरणांमध्ये एकूण ४८६० द.ल.घ.फूट (४.८६ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा असून धरणांची टक्केवारी १६.३८ टक्के आहे, अशी माहिती नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्र. ०१ चे कार्यकरी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली.
यावर्षी जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या असत्या; मात्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधन व्यक्त होत आहे, पावसाला सुरुवात झाल्याने वडज, माणिकडोह, पिंपळगाव जोगा, चिल्हेवाडी आणि डिंभा या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे पाणी येण्यास सुरुवात झाली आहे.
कुकडी प्रकल्पातील सर्व धरणांमध्ये एकूण ४८६० द.श. घ. फूट उपयुक्त पाणीसाठा आहे. सर्व धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यावेळी ३.०१ टक्के पाणीसाठा जादा आहे.
धरणातील पाणीसाठा (द.श.घ.फूट) आणि टक्केवारी पुढीलप्रमाणे
येडगाव - ६३१ - ३२.४८ टक्के
माणिकडोह - १०६७ - १०.४८ टक्के
वडज - ३३० - २८.१३ टक्के
चिल्हेवाडी - ३१९ - ३९.८० टक्के
डिंभा - २८३१ - २२.६६ टक्के
विसापूर - १९० - २१.०४ टक्के
घोड - ३५३ - ७.२४ टक्के