Join us

आज दुपारपासून उजनीतून पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2023 9:43 AM

दि. १८ रोजी दुपारपासून उजनी धरणातून ६००० क्युसेकने भीमा नदीपात्रात पंढरपूरसह सोलापूर शहरासाठी एकाच वेळी पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे.

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोमवार दि. १८ रोजी दुपारपासून उजनी धरणातून ६००० क्युसेकने भीमा नदीपात्रात पंढरपूरसह सोलापूर शहरासाठी एकाच वेळी पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. यावेळी भीमा नदीच्या दोन्ही काठांवरील विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. शेतीसाठी मात्र शासनाच्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे.

पंढरपूर शहराबरोबरच इतर छोट्या-मोठ्या गावांसाठी भीमा नदीपात्रातून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना भीमा नदी ऐन पावसाळ्यात कोरडी पडल्याने बंद पडण्याच्या मार्गावर होत्या. त्यामुळे या पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून असणाऱ्या लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नदीपात्रातून पाणी सोडण्याची मागणी होत होती.

अखेर सोमवारी यास मुहूर्त मिळाला असून दुपारी धरणाच्या दरवाजातून ६००० क्युसेकने पाणी सोडले जाणार आहे. हे पाणी केवळ पिण्यासाठी सोडले जाणार असल्याने या पाण्याचा वापर शेतीसाठी करू नये म्हणून नदी काठावरील विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

उपयुक्त साठा आता सहा टीएमसीवर येणार- बंडगार्डन व दौंड येथून येणारा विसर्ग जवळपास थांबला आहे. मागील दोन दिवसांपासून उजनी धरणाची संथ गतीने होणारी वाढही थांबली असून उलट पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. यातच आता सोलापूर व पंढरपूर शहरांसाठी सहा टीएमसी पाणी वापरल्यास धरणातील उपयुक्त साठा पुन्हा कमी होऊन तो सहा टीएमसीवर येणार आहे.- या काळात पाऊस पडला नाही तर ही पातळी आणखी कमी होऊन शकते. त्यामुळे शेतीला पाणी सोडण्याच्या निर्णयाचे काय होणार याकडेच सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे.- पावसाळा संपत आला तरी उजनी धरणाचा उपयुक्त जलसाठा केवळ १२.७९ टीएमसी एवढाच असून धरण २३.८८ टक्के भरले आहे. यातूनच ६ टीएमसी पाणी सोलापूर व पंढरपूर शहरांसाठी सोडण्यात येणार आहे. यातच पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पडणारा पाऊस जवळपास थांबला असून मागील २४ तासांत वडिवळे (१२ मिमी), कळमोडी (६ मिमी), मुळशी (१३ मिमी) पावसाची नोंद झाली आहे.- उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेल्या १९ धरणांपैकी सुमारे १२ ते १३ धरणे शंभर टक्के भरत आल्याने या धरणातूनच थोडे थोडे पाणी उजनी धरणात सोडून ते पाणी शेतीसाठी सोडण्यात यावे अशी मागणी आता उजनी धरण लाभ क्षेत्रातील शेतकरी करीत आहेत.

धरणाची सद्यस्थितीएकूण पाणीपातळी:  ४९२.७२५ मीटरएकूण जलसाठा:  ७६.४५ टीएमसीउपयुक्त जलसाठा:  १२.७९ टीएमसीटक्केवारी:  २३.७८

इन फ्लो:बंडगार्डन:  ७२९ क्युसेकदौंड:  ४३० क्युसेक

टॅग्स :धरणपाणीपाऊसनदीपंढरपूरसोलापूरशेती