राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरुच असून महराष्ट्रात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पूर्व महाराष्ट्रात ढगंच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.
सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती इशान्य राजस्थान ते मध्य महाराष्ट्रापर्यंत सक्रीय आहे. परिणामी आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा विभागात वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान आज १६ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टीवर पुन्हा उष्ण व दमट हवामान राहणार असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात वादळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात आज बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास राहणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.