चक्राकार वाऱ्यांची स्थिती इशान्य राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रावर सक्रीय असल्याने महाराष्ट्रात मराठवाडा, कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मागील आठवड्यात कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवली होती. असून या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून आज दि १८ व १९ मे पर्यंत हा प्रभाव राहणार आहे.
दरम्यान मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, साेलापूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांना तर विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर शुक्रवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. दरम्यान आज किनारपट्टीच्या भागात आजही हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाचा पुढील दोन दिवसाचा अंदाज असा
दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून मिळालेल्या अंदाजानुसार, कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.