राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आल्यानंतर आज दि २३ रोजी विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून कोकण किनारपट्टीवर उष्ण व आर्द्र हवामान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती दक्षिण मराठवाड्यावर तसेच पश्चिम विदर्भावर सक्रीय आहे. परिणामी विदर्भ मराठवाड्यासह मध्य महराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे.
कोकण किनारपट्टीवर सध्या उष्ण व आर्द्र हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान २३ ते २६ एप्रिल दरम्यान हवमान असेच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
कुठे यलो अलर्ट?
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे जिल्ह्याला उष्ण व आर्द्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात आज धाराशिव, लातूर या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून बीड, नांदेड जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात सोलापूरमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून सांगलीमध्येही पावसाची शक्यता आहे.
तापमान वाढणार
दरम्यान राज्यात तापमानात येत्या चार ते पाच दिवसात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.