भारतीय हवामान विभागाने ५ ते ९ मे पर्यंत राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला असून मराठवाडा, विदर्भात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस उन्हाचा चटका कायम राहणार असून येत्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे.
सध्या चक्राकार वाऱ्याची स्थिती उप हिमालय पश्चिम बंगालकडून मराठवाड्यावर सक्रीय आहे. परिणामी इशान्य भारतासह मराठवाडा, विदर्भ-खान्देशात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. येत्या २४ तासांत तापमानात ४ ते ५ अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे.
कुठे कोणता अलर्ट?
ठाणे, रायगड, रत्नागिरी. सिंधुदूर्ग भागात उष्ण व आर्द्र हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उद्यापासून मराठवाड्यातील नांदेड, लातूर तर खान्देशातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
यावेळी वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.