Join us

मराठवाड्यात चार दिवस हवामान कोरडे, फळबागा, भाजीपाल्याची अशी घ्या काळजी..

By मुक्ता सरदेशमुख | Published: February 17, 2024 1:04 PM

मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये काल (दि १६) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, पुढील चार दिवस मराठवाड्यात कोरडे हवामान राहणार असल्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे.

आज किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नसली तरी आता किमान तापमानात हळुहळु २ ते ३ अंशाने  घट होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 21 ते 27 फेब्रुवारी 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

धरणसाठा खालावतोय! आता राज्यातील धरणांमध्ये किती पाणी उरलंय?

दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे.

फळबागांना असे जपा..

  • कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. 
  • कमाल व किमान तापमानातील तफावतीमूळे मृगबहार धरलेल्या लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. 
  • रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. 
  • डाळींब बागेत अंबे बहार धरण्यासाठी छाटणी करून घ्यावी व बागेस हलके पाणी देऊन (अंबवणी करणे) शिफारसीत खतमात्रा द्यावी. 
  • काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. 

भाजीपाल्याची अशी घ्या काळजी..

  • भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. 
  • काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
  •  कमाल व किमान तापमानातील तफावत व मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
टॅग्स :तापमानमराठवाडाभाज्या