Weather :
गोविंद इंगळे
निलंगा तालुक्यातील खरीप हंगामाच्या पिकाची परिस्थिती चांगली दिसत असली, तरी सुध्दा अपेक्षित पाऊस पडलेला नाही. अद्याप नदी-नाले ओसंडून वाहिले नाहीत.
त्यामुळे तालुक्यातील नदीवरील बंधारे, छोटे- मोठे तलाव अद्याप भरलेले नाहीत.
निलंगा तालुक्याला मोठ्या पावसाची गरज आहे. मात्र, आता परतीच्या पावसावरच रब्बी हंगामाचे भवितव्य अवलंबून असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येते.
निलंगा तालुक्यात आतापर्यंत ५०३ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली असून, वर्षाकाठी ८१२ मिलिमीटरची नोंद झाली तरच वर्षाची सरासरी पूर्ण भरते.
आणखी किमान ३०० मिलिमीटर पाऊस पडला तरच तालुक्याची सरासरी भरून निघणार आहे. मोठा पाऊस झाल्याशिवाय ओढेही वाहणार नाहीत.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले तरी अद्याप अनेक भागांत अपेक्षित पाऊस पडला नाही.
त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील एकूण १ लाख ११ हजार हेक्टर लागवड क्षेत्र असून, यात निलंगा तालुक्यातील लिंबाळा येथील उच्चस्तरीय बंधारा पावसाळा सरत आला तरी अद्यापही वाहता झाला नाही.
यंदा असे आहे क्षेत्र
१ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्राची पेरणी झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन ७६ हजार ७१९ हेक्टर, मूग १५५९, उडीद १४९० हेक्टर, तूर १३४५ हेक्टर, ज्वारी ६८७ हेक्टर, बाजरी १२८ हेक्टर, मका ६१३ हेक्टर, ऊस ४७०० हेक्टर, फळबागा २८० हेक्टरवर पीकपेरा झाला आहे. सध्या ही पिके जोमात आली आहेत.
रब्बी हंगामासाठी चांगला पाऊस हवा
निलंगा तालुक्यात उच्चस्तरीय मदनसुरी, लिंबाळा, बोरसुरी, तगरखेडा, होसुर, येळणूर, सोनखेड व देवणी तालुक्यातील धनेगाव या उच्चस्तरीय बंधारे व मध्यम प्रकल्प मसलगा, साकोळ, गिरकचाळ, औराद (शहाजनी) या प्रकल्पांत ७० ते ७५ टक्के पाण्याचा साठा असला तरी फक्त काही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. मात्र, मोठा पाऊस होऊन सर्वत्र पाण्याची पातळी वाढली तरच रब्बी हंगामात पाण्याची कमतरता भासणार नाही, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
औराद शहाजानीत सर्वाधिक ५६४ मि.मी.
• निलंगा तालुका महसूल विभागात आतापर्यंत पानचिंचोली ४६६ मि.मी., निटूर ४३३ मि.मी., औराद शहाजनी ५६४ मि.मी., कासार बालकुंदा ६१२ मि.मी., हलगरा ५६१ मि.मी., भूतमुगळी ३९५.५ मि.मी., अंबुलगा ५२५ मि.मी., मदनसुरी ४७३ मि.मी., कासार शिरशी ५०६ मि.मी. असा एकूण ५०३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तालुक्यात एकूण ८१२ मिलिमीटर पावसाची महसूल विभागात नोंद होणे गरजेचे आहे.
• पावसाळा सुरू होऊन दोन महिने लोटले तरी अद्यापही तालुक्यातील अनेक भागातील ओढेही वाहिले नाहीत. सध्या सोयाबीनचे पीक जोमात आले असले तरी रबी हंगामातील पिकांसाठी पाऊस पडते आवश्यक आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची गरज आहे.