पावसाने वाशिम जिल्ह्यात सरासरी ओलांडली असून, जून महिन्यात अपेक्षित सरासरीच्या १०९.४० टक्के पाऊस पडल्यानंतर आता जुलै महिन्याच्या सुरुवातीलाही पाऊस दमदार हजेरी लावत आहे.
अशातच वाशिम जिल्ह्यात पुढील चारही दिवस सार्वत्रिक स्वरूपात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार ७ जुलै ते १० जुलैपर्यंत वाशिम जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाने हजेरी लावल्यास पावसाच्या सरासरीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
वाशिम जिल्ह्यात १ जून ते ५ जुलैपर्यंत सरासरी २०५.७० मिमी. पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात या कालावधीत जिल्ह्यात २३९.९० मिमी. पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण अपेक्षित सरासरीच्या ११६.६० टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. जुलै महिन्यात गत पाच दिवसांत अपेक्षित सरासरीच्या १४७.१० मि.मी. पावसाची नोंद झाली, हे प्रमाण २०५.७० टक्के आहे.
आता हवामान खात्याने रविवार ते बुधवारदरम्यान वाशिम जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. आता हा अंदाज खरा ठरल्यास नदी, नाल्यांना पूर येऊन प्रकल्पांच्या पातळीत वाढ होणार आहे.
चारही दिवस येलो अलर्ट
हवामान खात्याने पुढील चार दिवसांकरीता वर्तविलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाची दाट शक्यता आहेच, शिवाय या चारही दिवसांसाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यात मंगळवार आणि बुधवारी जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टीची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
सर्वच तालुक्यात पावसाने ओलांडली सरासरी
वाशिम जिल्ह्यात जून महिन्याच्या अखेरपर्यंतही मानोरा (८०.२० टक्के) आणि वाशिम (९५.४० टक्के) या दोन तालुक्यात पावसाची सरासरी कमी होती. तथापि, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून या दोन्ही तालुक्यात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडल्याने आता जिल्ह्यातील सहाही तालुक्यात पावसाची सरासरी १०० टक्क्यांच्यावर पोहोचली आहे.