पुणे : सध्या महाराष्ट्रातील जवळपास सर्व भागांमध्ये मान्सून पोहोचला असून, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. राज्यातील बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (दि. १४) पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी मान्सून पोचला असून, केवळ विदर्भातील काही भागात तो अद्याप गेलेला नाही. तरीदेखील मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, कोकणातील काही भागात जोरदार सरी कोसळत आहेत. मान्सूनची गुरुवारी (दि. १३) काहीच प्रगती झाली नाही.
परंतु, मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. सध्या मान्सून अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत असून, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रदेखील व्यापलेला आहे.
सध्या मान्सूनची प्रगती नसल्याने त्याची सीमा नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, बिजापूर, सुकमा, मलकानगरी आणि विजयानगरम या भागात आहे. पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये मान्सून ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात जाईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस होत असल्याने त्या ठिकाणचे शेतकरी सुखावले आहेत. दरम्यान, शुक्रवारी (दि. १४) विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नगर जिल्ह्यात काही भागात हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे. येत्या तीन दिवसांमध्ये संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
१५ ते १७ जून भंडारा, नागपूर, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वर्धा या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.