पुणे : मान्सूनने मंगळवारी (दि.११) राज्यातील जळगाव, अकोला, पुसदपर्यंत प्रगती केली आहे, उर्वरित राज्यात पोहोचण्यासाठी पोषक हवामान तयार झालेले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून आणखी काही भाग व्यापणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
राज्यातील निम्मा भाग मान्सूनने व्यापला आहे. सध्या मान्सून जळगाव, धुळे, बुलडाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे. तसेच संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापलेला आहे.
मंगळवारी गुजरातमध्येही मान्सूनने प्रवेश केला. दोन दिवसांमध्ये मान्सून तेलंगणा आणि छत्तीसगडच्या आणखी काही भागांमध्ये मजल मारेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
आज इशारा कुठे? बुधवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये बहुतांश ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागांमध्ये 'येलो अलर्ट आहे. पुडील ४८ तासांमध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, बीड, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव, अहमदनगर, सोलापूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला.
अधिक वाचा: Maharashtra River कृष्णा, वारणेच्या पाणीपातळीत ३ फूट वाढ