Weather forecast: तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. पाऊस (Rain) फारसा नाही. पण, सकाळी १० वाजेपासून सुरू होणारा उकाडा सायंकाळपर्यंत कायम असतो. एवढा उकाडा संपूर्ण उन्हाळ्यात सुद्धा जाणवला नाही. याची काही कारणे असू शकतात का? कारण त्रास प्रचंड होतोय? असा प्रश्न जळगाव जिल्ह्यातून विचारण्यात आला.
त्याचे कारण असे आहे.जळगांव जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची ही २२५ मीटरच्या आसपास आहे. म्हणजे पुणे,नाशिक शहरांच्या उंचीपेक्षा निम्म्यापेक्षाही खालीही आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्यात इतर भागापेक्षा हवेचा दाब हा नेहमी जास्त असतो.
आणि जेथे हवेचा दाब जास्त असतो तेथे इतर भागापेक्षा दुपारी ३ वाजेचे कमाल व पहाटे ५ वाजेचे किमान असे दोन्हीही तापमाने तेथे खुपच अधिक असतात.
जून महिन्याचा जळगांव शहर व जिल्ह्याचा विचार केला तर दुपारचे सरासरी कमाल तापमान हे ४२ डिग्री से. ग्रेड असते. आतापर्यंत जून महिन्यात सगळ्यात जास्त ४७ डिग्री से.ग्रेड नोंदलेले आहे.जून महिन्यात जळगांव शहरांत सरासरी फक्त केवळ १३ सेमी.पाऊस तर १३ दिवस पावसाळी असतात. आर्द्रता ४९% तर दिवसाचे सूर्यप्रकाशाचे तास सर्वाधिक म्हणजे १३ तास आहेत.
वातावरणात आल्हाददायकपणा साठी ही आकडे अपुरे तर सूर्य तळपण्याचे तास अधिक आहेत. शिवाय वाऱ्याचा वेग हा ताशी ८ किमी.च्या आसपास असतो, तो वारा वेग संचित उष्णतेचे उच्च हवा दाब पार्सल फोडण्यास अपुरा ठरतो. म्हणजे उष्णतेच्या भांड्यात माणूस बसवल्यासारखी तेथील जनजीवनाची अवस्था होते.
शिवाय सगळ्यात जास्त लांबीचा दिवस हा २१ ते २३ जून दरम्यान असतो.आणि त्या दरम्यान सूर्य हा कर्कवृत्तावर असतो. म्हणजे जळगांव भागापासून केवळ तो १५० ते १७५ किमी उत्तरेला असतो. म्हणून तर जून महिन्यात १३ तास तेथे सूर्य आग ओकत असतो. मान्सून पोहोचण्याची सरासरी तारीख १५ जून असली तरी मान्सून उशिराच पोहचतो. त्यामुळे जून महिन्यात थंडावा मिळण्याचे दिवस फारच कमी मिळतात.
या सर्व एकत्रित परिणामातून जळगांव जिल्ह्यात जून मध्ये मानवी जनजीवनास असह्य उकाडा जाणवतो.
माणिकराव खुळे, निवृत्त हवामान शास्त्रज्ञ, पुणे