पुणे: हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी 'डेटा अॅनालिसिस', आधुनिक तंत्रज्ञान जसे एआय आणि मानवी बुद्धिमत्ता या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक आहे. मेट्रॉलॉजी हे एक विज्ञान आहे.
आज या क्षेत्रासाठी तंत्रज्ञानाची मोठी मदत होत आहे. पूर्वीच्या नोंदी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन हवामान विभागाने अचूक अंदाज देण्यावर काम करावे, अशी अपेक्षा भारतीय पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी व्यक्त केली.
हवामान प्रशिक्षण संस्था (एमआयटी), भारतीय हवामान विभाग, पुणे (आयएमडी) आणि जागतिक हवामान संघटना (डब्ल्यूएमओ) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २६) 'हवामान अंदाज वर्तविण्याच्या क्षमतेचा विकास' यांवरील कार्यशाळेचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
हा कार्यक्रम महिनाभर सुरू असणार आहे. यावेळी आयएमडीचे महासंचालक डॉ. एम. महोपात्रा, आयआयटीएम-पुणेचे संचालक डॉ. आर. कृष्णन, आयएमडी-पुणे (संशोधन) चे प्रमुख के. एस. होसाळीकर, डब्ल्यूएमओचे समन्वयक डॉ. पॉल बेगई, शास्त्रज्ञ डॉ. गीता अग्निहोत्री, आदी उपस्थित होते.
महोपात्रा म्हणाले, आशिया खंडातील १० ठिकाणी असा प्रशिक्षण कार्यक्रम होत आहे. त्यामधील दोन ठिकाणे भारतात आहेत. त्यात दिल्ली आणि पुण्याचा समावेश आहे. हवामान अंदाज अचूकपणे सांगता यावा, यासाठी हे विशेष प्रशिक्षण असणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून विविध मॉडेल्स तयार केले. त्याद्वारे आणि यापूर्वी घेतलेल्या नोंदींद्वारे हवामान अंदाज व्यक्त होत आहे. सॅटेलाइट इमेज, रडार अशा गोष्टींमुळे अधिक फायदा होत असून, वादळाची अचूक माहिती विशेष प्रणालीमुळे देता येत आहे. महिनाभरात दिलेल्या अंदाजांची पडताळणीदेखील करण्यात येईल.
डॉ. रविचंद्रन म्हणाले, आज हवामान अंदाज देताना अधिकाधिक मॉडेल्स आणि शास्त्रज्ञांचा सहभाग असायला हवा. प्रत्येक किलोमीटरवरच्या नोंदी आपण घेऊ शकत नाही.
त्यामुळे सर्व ठिकाणचा डेटा घेऊन त्याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. सामान्य नागरिकांपर्यंत आपण जायला हवे. त्यांच्याशी संवाद साधून आपल्यावरील विश्वासार्हता अधिक स्पष्ट केली पाहिजे.
नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. सॅटेलाइटद्वारे, रडारद्वारे आपल्याला अचूकता अधिक आणता येईल, महिनाभराचा अंदाज वर्तविल्यानंतर आपण नेमके कुठे चुकलो आणि कुठे बरोबर आलो, याचे विश्लेषण करायला हवे. त्यातून आपण डेटा अॅनालिसिस अधिक चांगल्या प्रकारे करू शकू. - डॉ. एम. रविचंद्रन, सचिव, भारतीय पृथ्वी व विज्ञान मंत्रालय, दिल्ली