Maharashtra Weather News : देशात नैऋत्य मोसमी पाऊस १९ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर दाखल होणार असल्याचा अंदाज नुकताच हवमान विभागाने दिला आहे. दरम्यान, राज्यात काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून अजून दोन दिवस पावसाला पोषक वातावरण राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण याच कालावधीत किनारपट्टीच्या भागात उष्णतेच्या लाटांचा अंदाजही देण्यात आला आहे.
नक्की काय आहे हवामान विभागाचा अंदाज? कुठे नक्की पाऊस होणार आहे? कुठे उष्णता वाढतेय? पाहूया सविस्तर अंदाज...
१५ ते १७ मे पर्यंत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे. यावेळी तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती इशान्य अरबी समुद्र आणि त्याला जोडून केरळपर्यंत सक्रीय आहे. त्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.
कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाटसदृष्य स्थिती निर्माण झाली असून किनारपट्टीवरील तापमान ३ ते ४ अंशांने वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस या भागत दमट व उष्ण वारे वाहतील. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढताच पहायला मिळत आहे.
कुठे कोणता अलर्ट दिला?
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात धुळे, नंदूरबार, जळगाव, अकोला, भंडारा तर मध्य महाराष्ट्रात नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा,सांगली, सोलापूरसह मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.