मागील आठवडाभर महाराष्ट्रावर सक्रीय असणारे चक्राकार वारे आता मध्य प्रदेश ते दक्षिणेत कर्नाटकाकडे सरकले असून आता अवकाळी पावसाची शक्यता ओसरली आहे. आज राज्यात पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आला नसून केवळ ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्ण व आर्द्र हवमानाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित सर्व ठिकाणी आज कोरडे हवामान राहणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवले.
दरम्यान, राज्यात आता तापमान २ ते ३ अंशांनी वाढणार असून नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामाना करावा लागत आहे. २९ एप्रिल रोजी पुण्यात तापमानवाढीमुळे नागरिक हैराण झाले होते. दिवसा तापमानाचा पारा ४२ अंशांपेक्षा अधिक असल्याचे हवमान विभागाचे पुणे प्रमुख के एस होसाळीकर यांनी सांगितले.
दरम्यान, काल पुण्यात रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झाली असून कोरेगाव पार्क, वडगावशेरी येथे ४३.३ अंश तापमानाची नोंद झाली. सोलापूरमध्ये काल सर्वाधिक ४३.७ तापमान नोंदवले गेले. मराठवाड्यात ४१ ते ४३ अंशांपर्यंत तापमान जात असून मुंबई कोकण विभागात उष्णतेची लाट होती.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! अवकाळी वातावरणापासून सुटका मिळणार, वाचा हवामान अंदाज
दि. ३० एप्रिलपासून खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा संपूर्ण १० जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील सर्व नव्हे परंतु काही भागात, पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा ४ तर दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा २ डिग्री से. ग्रेड ने वाढल्यामुळे दिवसाची उष्णतेबरोबर रात्रीच्या उकाड्यातही कमालीची वाढ होवून काहिली जाणवणार आहे. विशेषतः रात्रीचा उकाडा अधिक जाणवेल.