सध्याच्या ढगाळ आणि दाट धुक्याच्या वातावरणामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. हळूहळू राज्यातील काही भागात हे वातावरण निवळू लागले आहे. तर काही भागात पुढील काही दिवसांत निवळणार असल्याचे संकेत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहेत. 8 डिसेंबरनंतर संपूर्ण राज्यातील ढगाळ हवामानाचे वातावरण बदलणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाऊस थंडी, धुके असं सगळंच वातावरण अनुभवयास मिळत आहे. मध्यतंरी झालेल्या अवकाळी आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडच पाणी पळवले. आता कुठे हळूहळू या वातावरणात बदल जाणवू लागला आहे. मात्र सकाळच्या सुमारास दाट धुके येत असल्याने अजून काही दिवस अशा वातावरणाचा सामना करावा लागणार आहे. तर साधारण 8 डिसेंबर पासून हे वातावरण निवळून थंडी जाणवणार आहे. याबाबत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी थंडी सुरु होण्याचे संकेत दिले आहेत.
खुळे यांच्या अंदाजानुसार, सध्या उत्तर भारतात जम्मू-काश्मीर पर्वतीय क्षेत्रात पश्चिमेंकडून पूर्वेकडे जाणाऱ्या जमिनीवरच्या (पश्चिमी झंजावात) चक्री वादळातून जबरदस्त बर्फबारी होत आहे. तर अडीच हजार किमी. अंतरावर दक्षिणेत पूर्वेकडून पश्चिमेकडे येणाऱ्या 'मिचॉन्ग ' समुद्री चक्रीवादळातून चेन्नई-सीमांध्र पूर्व किनारपट्टी भागात जोरदार पाऊस होत आहे. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात आज रविवार 3 डिसेंबर पासूनच ढगाळ वातावरण पूर्णपणे निवळून हळूहळू थंडीला सुरवात होण्याची शक्यता जाणवते.
ढगाळ वातावरण निवळणार महाराष्ट्रातील लातूर नांदेड परभणी हिंगोली व संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणसहीत तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. व शुक्रवार ८ डिसेंबरपासून ह्या ठिकाणीही ढगाळ वातावरण पूर्णपणे निवळून हळूहळू थंडीला येथेही सुरवात होण्याची शक्यता जाणवते. लाल कांदा काढणी, उन्हाळ कांदा रान मशागतव लागवड, गहू रान मशागत व पेरणी, सुरु ऊस लागवड इ.सारखी शेतकामे उत्तम वाफस्यावर उरकण्याचे, तसेच ज्वारी व हरबरा पिकांची खारव-ओघळणी सारखे सिंचनाचे, नियोजन करण्यास आता हरकत नसावी, असे वाटते.